नवी दिल्ली – एटीएम कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय नव्या निर्णयाच्या विचारात आहे. त्याअनुषंगाने येत्या काही दिवसांत पाच हजाराहून अधिक रक्कम काढण्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पाच मोफत व्यवहारात समाविष्ट होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एटीएममधून पाच हजार रुपये काढण्यासाठी ग्राहकांकडून अंदाजे २४ रुपये आकारण्यात घेऊ शकतात. सध्या अस्तित्त्वात असलेल्या यंत्रणेत पाच व्यवहार विनामूल्य असून त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये शुक्ल आकारले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार आरबीआयने एटीएम शुल्कावर पुनर्विचार करण्यासाठी खास समिती स्थापन केली आहे. समितीने केलेल्या शिफारसी नुसार, जर एखादा ग्राहक एटीएममधून एकावेळी पाच हजाराहून अधिक रुपये काढत असेल तर त्यामधून ठराविक शुल्क वसूल केले जावे. ग्राहकांनी अधिकाधिक व्यवहार एटीएम एेवजी ऑनलाईन करावे यासाठी आरबीआय प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. समितीच्या शिफारशी मान्य झाल्यास साधारण ८ वर्षांनंतर एटीएमच्या नियमात मोठा बदल होणार आहे. त्याचप्रमाणे, कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये एटीएमचा वापर वाढविण्यात येणार आहे. यात १० लाखाहून कमी लोकसंख्येच्या शहरांचा समावेश असणार आहे. लहान शहरे व खेड्यांवर लक्ष केंद्रित करून समितीने छोटे छोटे व्यवहार मोफत ठेवले आहेत. नियमानुसार या शहरांमध्ये व खेड्यांमध्ये ग्राहकांना सहा वेळा एटीएममधून पैसे काढण्याची मुभा देण्यात येणार आहे. सध्या ही सुविधा फक्त पाच वेळा उपलब्ध आहे.
—
रेशन दुकानात एटीएम सुविधा
आरबीआयचे लक्ष ग्रामीण भागाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, सरकारी आणि खासगी बँका आता ग्रामीण भागातील बँकिंग सुविधेमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांना दहा हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी गावातील पीडीएस रेशन शॉपमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेशन दुकानात बसविण्यात आलेल्या ई-पास मशीनमध्ये सरकार मिनी एटीएमची व्यवस्था करणार आहे.