नाशिक – पैसे काढण्यासाठी मदतीचा बहाणा करत नजर चुकवून एकाने एटीएमची आदलाबदल करून तब्बल ६८ हजार ९६७ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी हबीब बेग मोगल बेग मिर्झा (रा. ड्रिमपार्क, अशोका मार्ग) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हबीब मिर्झा हे ३१ डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास द्वारका येथील स्टेट बॅकेच्या एटीएम सेंटरवर गेले होते. यावेळी पैसे काढण्यासाठी त्यांनी एका अज्ञात व्यक्तीकडे मदत मागितली व एटीएम कार्ड त्यांच्याकडे दिले. मात्र, त्या अज्ञात व्यक्तीने पैसे निघत नसल्याचे भासवून मिर्झा यांचे कार्ड स्वत:जवळ ठेवले व त्यांच्याकडे असलेले बंद कार्ड मिर्झा यांना दिले. त्यानंतर काही वेळाने मिर्झा यांच्या खात्यातून २९ हजार ३८ रुपयांची रक्कम काढली. तसेच ३९ हजार ९२९ रुपयांची कार्डद्वारे खरेदी करत फिर्यादीची एकूण ६८ हजार ९६७ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक राऊत तपास करत आहे.