नाशिक : मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृध्दाच्या बँक खात्यातून परस्पर लाख रूपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुनीरोद्दीन कासम शेख (६४ रा.जयहिंद कॉलनी,अशोका मार्ग) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेख दि.१३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एसबीआयच्या बापू बंगला परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करून त्यांच्या ताब्यातील एटीएम कार्ड हातोहात लांबविले. यावेळी भामट्याने साहेबराव गोडसे नावाचे एटीएम कार्ड वृध्दाच्या हातात ठेवून हा उद्योग केला. मदत करतांना वृध्दाने सांगितलेला पिनकोडचा वापर करीत भामट्याने तीन दिवसात वेगवेगळय़ा एटीएम बुथमधून परस्पर एक लाख ५०० रूपयांची रोकड काढून घेतली. ही बाब लक्षात येताच शेख यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.