नाशिक – मदतीचा बहाणा करीत एटीएमची अदलाबदल करून भामट्याने महिलेच्या बँक खात्यातील ६१ हजाराची रोकड परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम वेगवेगळ्या ठिकाणाच्या एटीएम सेंटर आणि पेट्रोल पंपावरून काढण्यात आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता विजय केदारे (रा.एकलहरा रोड अरिंगळे मळा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. केदारे या गेल्या गुरूवारी (१७ सप्टेंबर) पती समवेत पैसे काढण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील निरंजन अॅटो सर्व्हिसेस या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे गेल्या होत्या. स्टेट बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये त्यांना एका भामट्याने मदतीचा बहाणा करून बँक खात्यावर डल्ला मारला. केदारे यांना मदत करीत असतांना संशयिताने पिनकोड पाहून तसेच त्यांचे कार्ड हातोहात लांबविले. यावेळी त्याने केदारे यांच्या हातावर दुसरे कार्ड हातावर ठेवल्याने हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र काही वेळातच आर्टीलरी सेंटर, संजीवनी अॅटो फ्युल व अभिनव फ्युल आदी ठिकाणांहून सुमारे ६१ हजार २३ रूपयांची परस्पर काढण्यात आली. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी बँकेत चौकशी करून पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास जमादार सय्यद तपास करीत आहेत.