ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील कर्मचारी हेरगिरी प्रकरणात सापडल्यानंतर नाशिकमधील संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात प्रकाश टाकणारी ही वृत्तमालिका….
इंडिया दर्पण विशेष वृत्तमालिका – सुरक्षेचे तीनतेरा – भाग २
‘एचएएल’मधील सीसीटीव्हींची गुणवत्ता ठरणार महत्त्वाची
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चा कर्मचारी हेरगिरीच्या सापळ्यात अडकल्याने त्याच्या तपासात एचएएलच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गुणवत्ता अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण, संशयित आरोपी दीपक शिरसाठ याच्या संरक्षण कायदा विरोधातील कृत्यांचा सबळ पुरावाच त्यातून मिळणार आहे.
देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या हवाई दलाला लागणाऱ्या लढाऊ विमानांची निर्मिती करण्यासाठी ओझर येथे एचएएल कारखाना साकारण्यात आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संरक्षण उत्पादन विभागाअंतर्गत या कारखान्याचे कामकाज चालते. एचएएलचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. एचएएलमध्ये सुरू असलेल्या सुखोई ३० एमकेआय या विमानाच्या निमितीतील महत्त्वाची व गोपनीय माहिती शिरसाठ याने पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला दिल्याचा संशय आहे. यासंदर्भात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शिरसाठला अटक करुन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीसाठी एटीएसचे एक पथक एचएएलमध्ये येऊन गेले तसेच एचएएलमधील विविध बाबींची सध्या तपासणी केली जात आहे. या प्रक्रियेत एचएएलच्या आवारात, शिरसाठ काम करीत असलेल्या विभाग आणि अन्य विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पुरावा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एचएएलमधील सीसीटीव्ही कॅमेरे हे काही वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांचा दर्जा आणि गुणवत्ता ही अलिकडच्या सीसीटीव्हींसारखी नाही. सद्यस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे ३६० अंशातील सर्व बाबी कॅप्चर करु शकणारे कॅमेरे उपलब्ध आहेत. या एका कॅमेऱ्याची किंमत लाखाच्या घरात आहे. त्यामुळे अशा उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांचा अभाव एचएएलमध्ये असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅटरी बॅकअप किती आहे, ही बाब सुद्धा महत्त्वाची आहे. १० ते ३० दिवसांचा बॅकअप साधारणपणे घेतला जातो. त्यातही जितका अधिक बॅकअप हवा असेल तेवढी यंत्रणा आणि खर्च अधिक असतो. त्यामुळे एचएएलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा बॅकअप किती दिवसांचा आहे, हे सुद्धा तपासाची दिशा ठरविणार आहेत. कारण, शिरसाठची चौकशी करताना गेल्या काही महिन्यांमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी लागणार आहे. तो नक्की कधी पासून आयएसआयच्या संपर्कात होता, या संपर्कापूर्वीच तो एचएएलच्या विविध विभागात जात होता का की त्यानंतर हे सारेच या तपासातून उलगडणार आहे. सर्वसाधारणपणे सरकारी विभागांकडून निधीबाबत ओरड केली जाते. त्यामुळे एचएएलने सुरक्षा कारणांसाठी आणि त्यातही सीसीटीव्ही यंत्रणेसाठी किती निधी दिला, किती चांगल्या गुणवत्तेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत यावरच आता एटीएसच्या तपासाची मदार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे यासंदर्भात येत्या काही दिवसातच उलगडा होण्याची चिन्हे आहेत.
(क्रमशः)