नाशिक – एचएएलकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना ते सोडविण्याकरिता नागरिकांसह, शेतकरी आसपासच्या गावातील सरपंच तसेच ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी यांनी खा.डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात एचएएल अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीसाठी नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी खा. डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले होते. त्यात एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या मागणी केली होती. त्यानंतर ही बैठक संपन्न झाली.
या बैठकीत शिरवाडे वणी येथे विमान कोसळून तेथील अनेक शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान झाले होते. परंतु, त्यांना अद्याप पावेतो देखील कुठल्याही प्रकारची भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळावी तसेच जानोरी ग्रामपंचायतीचा थकीत कर लवकरात लवकर वर्ग करावा. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता एचएएलने नियमित दळणवळणातील बंद केलेला रस्ता त्वरित खुला करावा. जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील गावांच्या रहदारीचा प्रश्न मार्गी लागेल व त्यांना दिलासा मिळेल. यासह आदी प्रश्न लवकरात लवकर एचएएल प्रशासनाने मार्गी लावण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या. सदर बैठकी प्रसंगी खा. डॉ. भारती पवार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नुकसानग्रस्त शेतकरी, जानोरी ग्रामपंचायतीचे सरपंच – सदस्य, प्रतिष्ठित नागरिक तसेच ओझर परिसरातील अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.