इंडिया दर्पण या वेबसाईटद्वारे दिवसागणिक नवनवीन विक्रम नोंदवला जात आहे. बुधवारचा विक्रम वाखाणण्याजोगाच आहे. त्यानिमित्ताने..
जगभराला बातम्या पुरविण्यासाठी एखादी वेबसाइट सुरु करणे फार सोपे काम आहे. ती रोज अत्यंत कार्यक्षमपणे चालवणे फार कठीण काम आहे. हा अनुभव अनेकांना आला असेल. कोरोना आल्यावर आणि छापील प्रसारमाध्यमांवर व त्यातील पत्रकारांवर अनेक प्रकारे परिणाम झाल्यावर अनेक पत्रकार ऑनलाईन माध्यमाकडे वळले.
बहुतेक लोकांना मर्यादित यश मिळाले. ते आपण समजू शकतो. कोरोना काळात जेव्हा वर्तमानपत्रांचा पुरवठा घरापर्यंत होत नव्हता त्या काळात व्हाट्सअँप, टेलिग्राम वगैरेवर येणाऱ्या बातम्या, वर्तमानपत्रांच्या PDF टीव्ही चॅनेल्स आणि वर्तमानपत्रांच्या वेबसाइट येथून बातम्या मिळत होत्या.
वर्तमानपत्रांचा पुरवठा सुरु झाल्यावरही याच ‘सोर्स’मधून बातम्या मिळवणे चालू होते. अजूनही मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांतही वाचकांनी वर्तमानपत्रे घरी सुरु केलेली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्या वातावरणात ‘इंडिया दर्पण’ (https://indiadarpanlive.com/) या वेबसाइट’चे यश ठळक उठून दिसते. हे प्रकर्षाने सांगावेसे वाटले ते बुधवारी त्यांच्या वेबसाइटवर शेअर केलेली बातमी ज्या पद्धतीने ‘व्हायरल’ झाली त्यामुळे.
सध्या महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ नावाने राज्यभर वेगवेगळ्या वेळेस जमावबंदी, संचारबंदी आणि शनिवार-रविवार lockdown आणला आहे. भयावह वेगाने पसरणारा कोरोना आटोक्यात आणायचा तर अशी पावले उचलायला हवीत याबद्दल आक्षेप नाही. परंतु यामुळे सामान्य माणसांबरोबरच रोजंदारीवर काम करणारे मजूर, छोटे- मोठे व्यापारी या सगळ्यांची खूप अडचण झाली.
मागच्या Lockdown च्या वेळेस या सगळ्यांनी सारे सहन केले, परंतु आता छोटे – मोठे उद्योग चालविणारे व्यापारी व उद्योगपती यांचे कंबरडे मोडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांत व्यापाऱ्यांची आंदोलने सुरु आहेत. कारवाई झाली तरी चालेल, पण आम्ही दुकाने उघडू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या संदर्भातल्या बातम्यांकडे अवघ्या व्यापारीवर्गाचे स्वाभाविकपणे लक्ष आहे. मी ज्या बातमीचा उल्लेख वर केला आहे ती याच संदर्भातली आहे.
‘कॅट ‘ या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी, सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चर्चेची माहिती ‘इंडिया दर्पण’ ला दिली. ही बातमी बुधवारी संध्याकाळी ४.१४ वाजता अपलोड करण्यात आली. काल दिवसभरात म्हणजे दुपारी सव्वा चार ते रात्री १२ या वेळेत ही बातमी तब्बल ३ लाख ४७ हजार ८१७ जणांनी वाचल्याचे लक्षात आले. आता आज सकाळपासूनही या बातमीची संख्या हजारोंच्या घरात आहे. हा आकडा सतत वाढतच आहे.
‘इंडिया दर्पण’ वेबसाइटला काल दिवसभरात जवळपास सव्वा चार लाख वाचकांनी भेट दिली. प्रसारमाध्यमांनी लोकोपयोगी बातमी दिली की वाचक ती बातमी आवर्जून वाचतात हे पुन्हा एकदा लक्षात आले. वाचकांना भरमसाठ राजकीय बातम्यांमध्ये अजिबात रस नसतो. त्यांच्या रोजच्या गरजा पुरवणाऱ्या बातम्या त्यांना हव्या असतात. दुकाने सुरु कारण्यासंदर्भातली बातमी व्यापाऱ्यांच्या व तुमच्या-माझ्यासारख्या ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने खूप वाचली गेली. यातून अनेकांना धडा घेण्यासारखा आहे.
‘इंडिया दर्पण’ सुरु झाले अवघ्या आठ महिन्यांपूर्वी. एवढ्या कमी काळात त्यांनी 30 लाख वाचकांचा (हिट्स) टप्पा पार केला आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे. नावाजलेल्या वर्तमानपत्रातून बाहेर पडल्यावर एखादी वेबसाइट सुरु करायची आणि इतक्या कमी कालावधीत लोकप्रिय करायची हे वाटते तेवढे सोपे काम नाही. वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल्स यांच्याकडे वेबसाइट चालवायला भक्कम आर्थिक पाठबळ असते.
वैयक्तिक पातळीवर वेबसाइट सुरु करताना, ती किती यशस्वी जाईल याची काहीही नेमकी कल्पना नसताना या जगात पदार्पण करायचे आणि ती यशस्वीही करून दाखवायची हे फार थोड्याना जमते. गौतम संचेती, भावेश ब्राह्मणकर, देविदास चौधरी या तिघांनीही (आणि तांत्रिकदृष्ट्या भक्कमपणे उभे असलेले तज्ज्ञ) हे ‘करून दाखविले’.
केवळ वेबसाइट चालविली असे नाही तर एका पुस्तकाद्वारे पुस्तक प्रकाशनात पदार्पण केले, यु ट्युब, ट्विटर, फेसबुक या समाजमाध्यमांचा योग्य उपयोग करून यश मिळविले. एवढेच नव्हे तर Whatsapp ग्रुप या सध्याच्या चलनी नाण्याचा उपयोग करत रोज असंखय बातम्या लोकांपर्यंत विनाविलंब पोचवल्या. आज त्यांचे दोनचार नव्हे तर तब्बल ५१ Whatsapp ग्रुप आहेत, एक टेलिग्राम ग्रुप आहे. आणि हे सगळे अत्यंत लहान टीम असताना.
एकूण टीम दहापेक्षाही कमी असताना सतत ताज्या बातम्या पुरवायच्या ही काम किती कठीण आहे याची पत्रकारांना नक्कीच कल्पना येईल. राष्ट्रीय, राज्य, स्थानिक बातम्या, विविध मुलाखती, नाशिकस्थित विविध क्षेत्रातील नामवंतांचे लेख, विडिओ आणि इतर बरेच काही, असे या ‘इंडिया दर्पण’चे वैशिष्ट्य आहे. सारे काही नवीन असल्याने अजून आर्थिक ताळमेळ हवा तसा जमत नाही, परंतु ज्या प्रकारे वाटचाल सुरु आहे ते पाहता तो लवकरच जमायला लागेल असे वाटते. गूगल आणि इतर दोन ठिकाणांहून जाहिराती सुरु झाल्या आहेत ही स्वागतार्ह बाब आहे.
ज्यांना अशी वेबसाइट सुरु करायची असेल त्यांच्यासाठी ही मार्गदर्शक म्हणून नक्कीच काम करू शकेल. अशा वेबसाइटची इतर प्रस्थापित वेबसाइटशी तुलना केली जाऊ नये. कारण त्यांच्याकडची साधने, आर्थिक पाठबळ आणि त्यांच्याकडचे सर्वच पाठबळ यात कमालीचा फरक असतो. म्हणूनच ‘इंडिया दर्पण’च्या यशाचे जास्त कौतुक वाटते.
‘इंडिया दर्पण’ च्या सर्व टीमचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!