टोकियो – सातत्याने होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी जपान सरकारने पहिल्यांदा एकाकीपण घालविण्यासाठी एका मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. इंग्लंडनंतर जगात दुसऱ्यांदाच हा प्रयोग होत असल्याचे बोलले जात आहे. जपानमध्ये गेल्या 11 वर्षांमध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यात गेल्या वर्षभरात कोरोना महामारी आणि त्याच्या उपचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनेही हातभार लावला.
जपान टाइम्सनुसार, पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 19 फेब्रुवारीला आपल्या मंत्रीमंडळात एकाकीपण मंत्री असे पद निर्माण केले होते. आता तेत्सुशी साकामोटे यांच्यावर या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे साकामोटे यांच्याकडे देशातील घटणारा जन्मदर आणि विभागीय अर्थव्यवस्थेचा विकास या बाबींचीही जबाबदारी आहे. त्यांनी एकाकीपण मंत्री म्हणून पदग्रहण केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वाढत्या आत्महत्या ही राष्ट्रीय समस्या असल्यामुळेच पंतप्रधानांनी जबाबदारी दिल्याचे सांगितले.
लोकांचे एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्याच्याशी संदर्भात उपक्रमांचे आयोजन वाढविणार असल्याचेही ते म्हणाले. सामाजिक एकाकीपण दूर करणे हे मुख्य लक्ष्य असेल, असेही ते म्हणाले. जपानमध्ये 4.26 लाख लोकांना कोरोना झाला आणि 7 हजार 577 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महिलांच्या आत्महत्या अधिक
2020 मध्ये जपानमध्ये आत्महत्यांचा दर वाढला आणि त्यात महिलांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आक्टोबर 2020 मध्ये 70 टक्के अधिक महिलांनी आत्महत्या केली होती. साकामोटे यांनी ही तातडीने लक्ष देण्याची बाब असल्याचे सांगितले. यावर उपाय शोधण्यासाठी पंतप्रधान तसेच विविध विभागांच्या मंत्रलांशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.
इंग्लंडने 2018 मध्ये केला होता प्रयोग
इंग्लंडने 2018 मध्ये अश्याच पदाची निर्मिती आपल्या मंत्रिमंडळात केली होती. अश्यापद्धतिचा प्रयोग करणारा इंग्लंड जगातील पहिलाच देश ठरला होता. एकाकीपणावरील उपाय शोधतानाच बालकांना गरिबीच्या संकटातून बाहेर काढण्यावरही जपान सरकार काम करणार आहे.
म्हणून वाढल्या आत्महत्या…
-
नोकरी गमावणे
-
शहरी भागांमधील एकाकीपण
-
महिलांवरील वाढती कुटुंबाची जबाबदारी
-
चाळीशीतील महिलांमधील नैराश्य
-
नोकरदारांवरील वाढता ताण