जळगाव – भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे पक्षाला खूप मानतात एक दोन आठवड्यात सर्व सुरळीत असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरुन जळगावमध्ये सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उशीरा सुचलेले शहाणपण अशा आशयाच्या पोस्टही व्हायरल होत आहे. पाटील यांनी मी नाथाभाऊशी बोललो आहे, पक्षात त्यांच्या बाबत सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यांना तुम्ही मीडियात बोलू नका असे सुध्दा मी सांगितले. त्यांनी ती मान्य केल्याचे ते म्हणाले.
खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा घटस्थापनेच्या मुहूर्तांवर होईल असे बोलले जात आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुध्दा केली गेल्याची चर्चा आहे. खडसे हे पक्षाच्या विरोधात बोलत असले तरी ते कार्यक्रमाला हजेरी लावणे चुकत नाही. पण, जामनेर येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतरही ते येथे गेले नाही. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली. आता तर खडसे यांच्याबरोबर मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मोजके कार्यकर्ते प्रवेश करतील व मोठा कार्यक्रम हा जळगाव येथे होणार असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीची रणनीती
दुसरीकडे राष्ट्रवादी गोटात खडसे पक्षात आल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका मंत्र्याला राजीनाम देऊन त्या जागी खडसे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्ष करुन त्यांचे मंत्रीपद खडसे यांना देण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.