नाशिक – एअर इंडिया कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत एका व्यक्तीने एअर इंडिया कंपनीच्या मालमत्तेचे फ्लॅट परस्पर विक्री करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याची कुणकूण दुय्यम निबंधक-२ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना समजल्याने त्यांनी सिडको प्रशासनाला माहिती दिली. तसेच, सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र सिडको प्रशासनाने सरकार वाडा पोलिसांना दिले आहे.
सिडको प्रशासक जी. व्ही. ठाकूर यांनी सरकारवाडा पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संजय वसंत गोसावी नामक व्यक्तीने एअर इंडिया कंपनी च्या मालकीचे असलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करत सदर फ्लॅटचे दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक वर्ग २ येथे सादर केले होते. मात्र येथील कागदपत्रांवर टंकलिपीक हरिष बडदे यांचा फोटो व सही शिक्का असल्याने सिडको चे काम हे कार्यालय सहायक अरशद खान हे बघत असल्याने व कागदपत्रांमध्ये सिडकोचा ना हरकत दाखला आढळून आला नाही.
ॲड. विश्वास अरिंगळे व दुय्यम निबंधक वर्ग २ यांना संशय आल्याने त्यांनी सिडको कार्यालयात टंकलिपीक हरिष बडदे यांना सदर प्रकार भ्रमणध्वनीवरून सांगितला. त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जात कागदपत्रांची खात्री करत तो आपला नसल्याचे सांगितले .
यावेळी सिडको प्रशासक ठाकूर यांनी गोसावी यांची चौकशी केली असता आपण एअर इंडिया चा प्रतिनिधी असल्याचे भासवले व त्याच्या बोलण्यात उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने ठाकूर यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
मात्र दुय्यम निबंधक वर्ग २ कार्यालय हे सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तिथे संपर्क केला व सर्व प्रकार अर्जाद्वारे पोलीस ठाण्यात येऊन संबंधित प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान गोसावी यांच्यावर २०१७ सालात अशाच प्रकारे फसवेगिरी चा प्रकार केल्याचे देखील पत्रामध्ये नमूद आहे.