मुंबई – भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अथॉरिटी आफ इंडिया) शिकाऊ उमेदवार पदासाठी भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे. याअंतर्गत जवळपास १८० पदांवर नियुक्ती होणार आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी आफ इंडियाच्या म्हणजे एएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
२४ जानेवारीपर्यंतच अर्ज करण्याची संधी असेल. त्यानंतर कुणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना उत्तर विभागातील विविध विमानतळांवर नियुक्त करण्यात येईल, हे विशेष. ७ जानेवारीला या पदांसाठीचे अर्ज उपलब्ध झाले असून पदवी किंवा पदविका प्राप्त उमेदवारांसाठी १६६ पदे तर आयटीआयसाठी १४ पदे असणार आहेत. अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग केलेला असावा. त्याच्याकडे चार वर्षांची पदवी आवश्यक आहे. तर आयटीआय विद्यार्थ्यांनी एआयसीटीई, जीओआयद्वारा मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलेले असावे, ही अट ठेवण्यात आलेली आहे. तसेच १ जुलै २०२० पर्यंत २६ वर्षे वय अनिवार्य आहे. त्यापेक्षा अधिक वयाच्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
अशी होईल निवड
सर्व पदांसाठी मेरीटच्या आधारावर निवड होणार आहे. ज्यांची निवड होईल त्यांना त्यांच्या अधिकृत इ-मेल आयडीवरच निरोप देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाता येईल. विशेष म्हणजे प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच योग्य आणि खरी माहिती प्राप्त होऊ शकेल, असेही कळविण्यात आले आहे.