थोटवे यांची फेरनियुक्तीवरुन भाजपा माध्यम विभाग प्रमुख पाठक यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
मुंबई – ‘महाजनकोच्या’ निर्मिती संचालकपदावर चंद्रकांत थोटवे यांची फेरनियुक्ती करण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी राबविलेली प्रक्रिया संशयास्पद असून या प्रक्रियेत ‘अर्थपूर्ण ‘ व्यवहार झाले असल्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रक्रियेला स्थगिती देऊन प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख आणि ‘महाजनको‘चे माजी संचालक विश्वास पाठक यांनी केली आहे. या संदर्भात पाठक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. या नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती न दिल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही पाठक यांनी दिला आहे.
पाठक यांनी सांगितले की, ‘महाजेनको’च्या निर्मिती संचालक पदावर कार्यरत असलेल्या थोटवे यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२० रोजी संपला आहे. निवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घ्यायचे नाही , असे जाहीर करण्यात आले होते. हा नियम गुंडाळून त्यांचीच पुन्हा या पदावर नियुक्ती करण्याच्या हेतूने कोरोना कालावधीत घाईघाईने ३१ ऑगस्ट रोजी १० उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमधून निवड समितीने दोन उमेदवारांची निवड केली. मात्र या नावांमध्ये ऊर्जा मंत्रांच्या मर्जीतल्या थोटवे यांचे नाव नसल्यामुळे या मुलाखतीचे निकाल जाहीर केले गेले नाहीत. मर्जीतल्या व्यक्तीची निवड झाली नाही म्हणून वरिष्ठांनी पूर्ण निवड प्रक्रियाच रद्द करून निवडल्या गेलेल्या उमेदवारांवर अन्याय केला. या प्रक्रियेला तत्कालीन ऊर्जा सचीव असीम गुप्ता यांनी विरोध केल्याने त्यांना या पदावरून हटविले गेले. ते या पदावर येऊन एक वर्षही झाले नव्हते. आता पुन्हा थोटवे यांची नियुक्ती करण्याचा घाट घालून २६ फेब्रुवारी रोजी ‘मुलाखतींच्या नाटकाच्या प्रयोगाचे ‘आयोज़न केले आहे. ऊर्जामंत्र्यांना थोटवे यांचीच नियुक्ती करण्याच्या धरलेल्या आग्रहामागे ‘ अर्थपूर्ण ‘ व्यवहार झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेभोवती संशयाचे वातावरण तयार झाले आहे. हा संशय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रक्रियेची चौकशी करावी व या नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती द्यावी, असेही पाठक यांनी नमूद केले .