मुंबई – मुंबईची आयलँडिंग यंत्रणा १२ ऑक्टोबरला कार्यान्वित न झाल्याने वीज पुरवठा ठप्प झाल्याबद्दल सोमवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी टाटा पॉवर या वीज निर्मिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका वठविणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्र,ऐरोली (SLDC) येथे राऊत यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन या केंद्राचे कामकाज कसे चालते याची पाहणी केली. यावेळेस टाटा वीज कंपनीचे अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर मुंबई आयलँडिंग यंत्रणा नेमकी काय आहे आणि १२ ऑक्टोबरला नेमके काय घडले याबद्दल सादरीकरण केले.
“मुंबईचे आयलँडिंग करणे आणि बाहेरून मुंबईला होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्यावर मुंबई शहराला अतिरिक्त वीज पुरवठा करणे ही जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्ही तुमच्या झालेल्या चुका लपवत आहात काय? चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे कबूल करा! जर मुंबईत संसद असती आणि पंतप्रधान बोलत असताना वीज ठप्प झाली असती तर तुम्ही हेच उत्तर दिले असते का?,” असे प्रश्न मंत्री डॉ राऊत यांनी विचारले.
या बैठकीला ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महापारेषण संचालक संजय ताकसांडे, तांत्रिक सल्लागार उत्तम झाल्टे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.