नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या गुप्तचर संस्थेकडून मेघालय-आसाम -बांग्लादेश सीमेवर राबवण्यात आलेल्या धडक आणि सुनियोजित मोहिमे दरम्यान उल्फाचा (आय ) कट्टर म्होरक्या एस एस कर्नल दृष्टि राजखोवा याने आपल्या एस एस कॉर्पोरल वेदांता, यासीन असोम, रूपज्योति असोम आणि मिथुन असोम या चार साथीदारांसह आत्मसमर्पण केले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली. गेल्या नऊ महिन्यातील अथक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
आसाममधील कारवायांमध्ये सहभागी असलेला दृष्टि राजखोवाचा बऱ्याच काळापासून शोध सुरु होता. त्याने केलेले आत्मसमर्पण या भूमिगत संघटनेला जबर धक्का आहे आणि आसाम क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक नवी सुरुवात आहे. या परिसरात शांतता आणि सामान्य स्थिती कायम राखण्यासाठी भारतीय लष्कर कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.