नाशिक – नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) च्या नाशिक इंडिया चॅप्टरने आयोजित केलेल्या जागतिक अंतराळ सप्ताहाचे पहिले पुष्प आज गुंफले गेले. इस्रोचे यू आर राव उपग्रह केंद्राचे माजी डायरेक्टर पद्मश्री डॉ. अण्णादुराई यांनी ‘भारतात जीवनमान सुधारण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा उदय: भविष्यातील दिशा’ या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या सादरीकरणात इनोव्हेशन याची व्याख्या आणि त्याचे पुढे व्यवसायात होणारे रूपांतर आणि त्यातून पुढे समाजासाठी होणारा दैनंदिन उपयोग याविषयी माहिती दिली. इस्रोने अनेक प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडले व त्या प्रत्येकाचा उद्देश हा विषय सापेक्ष होता. गेल्या पन्नास वर्षांमध्ये सामाजिक, व्यापारी, शैक्षणिक, शास्त्रीय अशी सुधारणा पाहायला मिळते त्यात उपग्रह तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पावलोपावली उपग्रहांच्या मदतीने अगदी नकळत उपयोग केला जातो. यात स्मार्टफोन, गाड्यांचे नेव्हिगेशन, टेलिव्हिजनच्या विविध वाहिन्या व विविध कार्यक्रम, हवामानाचा अंदाज, सुनामी, वादळ, महापूर, अपघात आणि लष्करी उपयोग यांची माहिती क्षणार्धात पोहोचवण्यासाठी उपग्रह महत्वाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपग्रहाचा उपयोग करण्याच्या पद्धतीची माहिती त्यांनी दिली. केळीच्या झाडाचे प्रत्येक भागाचा व्यापारीदृष्ट्या होणारा फायदा व त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक उत्पन्न याची माहिती देण्यात आली. तसेच शेतीमध्ये अगदी मशागतीपासून पेरणीपासून, ड्रोन द्वारे औषध फवारणी, पिकाच्या वाढीचे, त्याच्यावर येणारे रोग प्रत्यक्ष शेतात न जाता घरी बसून सुद्धा विविध सेन्सर्स द्वारे आपल्या मोबाईल फोनवर ही सगळी माहिती प्रपात करून परिणामकारक उपाययोजना करता येतात असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी भारताच्या उपग्रह योजनांविषयी माहिती दिली.
सूत्रसंचालन नाशिक इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी केले. देशातूनच नव्हे तर अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशातून सुद्धा अनेकजण यात सहभागी झाले होते.