पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत उपसरपंच पदावर विराजमान होऊन ८ दिवस उलट नाही तोच उपसरपंच विजय गांगुर्डे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिरवाडे वणी गावात शोककळा पसरली आहे.
महिनाभरापूर्वी निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. अख्या तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत काठावरच्या शह काट शहाच्या लढतीत केवळ विजय गांगुर्डे यांनी शिवसेनेचा हात सोडून राष्ट्रवादीचा हात धरल्याने शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची सत्ता आली. अपेक्षेनुसार उपसरपंचपदी विजय गांगुर्डे विराजमान होऊन ८ दिवस उलटत नाही तोच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे.
यश आले पण…
शिरवाडे वणी ग्रामपंचायतीत सलग ९ वर्ष विजय गांगुर्डे यांच्या पत्नी यांनी सदस्यपद तर व एक वर्ष सरपंच पद देखील भूषविले. तर विजय गांगुर्डे यांनी ग्रामपंचायतीची पहिल्यांदाच शिवसेनेकडून उमेदवारी केली. मात्र वेळेवर राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत ग्रामपंचायतीत स्थापन केलेली सत्ता गांगुर्डे यांच्या दुर्दैवी निधनाने औटघटकेची ठरली.