नाशिक – राज्यात व देशातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असतानाही नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाने कोरोनाला रोखल्याबद्दल कारागृह पोलिस उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी प्रशासनाचे कौतुक केले. झळके यांनी बुधवारी (१२ ऑगस्ट) कारागृहाला भेट दिली. सुरक्षा, शिस्त व कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला.
झळके म्हणाले की, कारागृहासाठी वेगळे लॉकडाउन आहे. त्याचे तसेच नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले. सर्वांनी योग्य ती दक्षता घेतली. बंद्यांना शाळेतील तात्पुरत्या जेलमध्ये ठेवले जाते. त्यांची कोरोना टेस्ट करुनच मुख्य कारागृहात प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळेच येथे कर्मचारी, बंदी यांना करोनाची लागन झालेली नाही. दरम्यान, यांनी कारागृहाची सुरक्षा, शिस्त यांचा आढावा घेतला. तसेच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करुन उपयुक्त सूचना करण्यात आल्या. यावेळी कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ निरीक्षक अशोक कारकर, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी बाबर, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.