नाशिक – उपनगर पोलिस स्टेशनचा हवालदार बाळासाहेब दामोदर सोनवणे यास १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. विवाहिता छळप्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिन मिळवून देण्यासह मदत करण्याच्या मोबदल्यात सोनवणे याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. पळसे येथील तक्रारदाराचा विवाह २८ ऑगस्ट २०१९ रोजी झाला होता. काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये वाद झाले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास जेलरोड येथील पोलिस चौकीत कार्यरत असलेले संशयीत हवालदार सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गेल्या आठवडयात तक्रारदार व त्यांच्या वडिलांना संशयीताने पोलिस चौकीत बोलाविले. यावेळी जामीन देण्यासाठी व या गुन्हयात मदत करण्यासाठी दहा हजाराची मागणी केली व पैसे दिले नाही तर तुम्हाला या गुन्ह्यात त्रास होईल असे बजावले. तक्रारदार पितापुत्राने पैश्यांची व्यवस्था करतो असे सांगून याबाबत एसीबीकडे याची तक्रार प्राप्त झाली. एसीबीने सापळा रचला. संबंधित व्यक्तीकडून १० हजार रुपये घेताना सोनवणे हा रंगेहाथ पकडला गेला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, लाच मागणे आणि देणे हा गुन्हा असून असा प्रकार घडत असल्यास एसीबीच्या १०६४ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.