नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधलं उन्नाव पुन्हा एकदा हादरलं आहे. उन्नाव जिल्ह्यातल्या एका शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन मुलींचे मृतदेह आढळले असून तिसऱ्या मुलीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. असोहा पोलिस ठाण्या हद्दीतल्या बबुरहा गावात ही घटना घडली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. तपासादरम्यान विषबाधेनं मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.
जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेच तीन मुली आढळल्या. माहिती मिळताच तिन्ही मुलींना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसर्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यानं तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले आहेत. गाव आणि आसपासच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आहे. उन्नावमधली घटना अत्यंत भयानक आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला तातडीनं एअर एम्ब्युलन्सनं दिल्लीतल्या एम्समध्ये आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही परिस्थितीत हाथरसच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असं आझाद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.