उद्योजक नंदकुमार कर्डक यांचा आरोप
नशिक – वाजवी दावा असताना अंबड औद्योगिक परिसरातील भूखंड त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करण्याचे कारस्थान एमआयडीसी नाशिक कार्यालयाकडून करण्यात येत असल्याचा आरोप उद्योजक नंदकुमार कर्डक यांनी केला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आपण याआधीच सादर केला असल्याने सदर भूखंड आपणास उद्योग विस्तारासाठी हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणीही कर्डक यांनी केली आहे. एमआयडीसी प्रशासनाचा लालफितीचा कारभार निषेधार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत कर्डक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वत:ची बाजू मांडली. यासंदर्भात ते म्हणाले, अंबड औद्योगिक परिसरातील प्लॉट क्र. पी. 27 (ए. एम. 41 पूर्वीचा हेलीपॅड) हा विस्तारित उद्योगासाठी मिळावा, यासाठी आपण रितसर एमआयडीसी कार्यालय, सातपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्लॉटवर होऊ घातलेला हेलीपॅडचा प्रस्ताव एका रात्रीत बासनात गुंडाळण्यात आल्याचे एमआयडीसी कार्यालयाकडून आपणास सांगण्यात आले. ही बाब लक्षात घेता तसेच उद्योग विस्ताराची गरज लक्षात घेतासंबंधित भूखंड आपणास अग्रहक्काने मिळणे आवश्यक आहे. यासाठी आपण २००८ पासून पाठपुरावा करीत आहोत. वस्तुत: आपण अनुसूचित जाती (एससी) जमातीमध्ये मोडत असून नियमानुसार या वर्गासह अनुसूचित जमाती (एसटी) साठी २० टक्के भूखंडांचे आरक्षण आहे. तथापि, एमआयडीसीकडे विचारणा केली असता त्यांनी हे आरक्षण निरंक दाखवल्याचा दावा कर्डक यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर आपण हा भूखंड प्राप्त करण्यासाठी पात्र असतांना तो त्रयस्थ व्यक्तीला हस्तांतरित करण्याचा घाट एमआयडीसी नाशिक कार्यालयाकडून घातला जात असल्याची आपली माहिती आहे. ही बाब धक्कादायक आणि अन्यायकारक असल्याचेही कर्डक यांनी नमूद केले. तसा व्यवहार करण्यात आल्यास तो शासकीय धोरणाला हरताळ फासणारा आणि बेकायदेशीर होईल. शिवाय, त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार आहे. यासंदर्भात, एमआयडीसी कार्यालयाने योग्य पाऊल न उचलल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई निर्णयकर्त्यांवर राहील, असा इशाराही कर्डक यांनी दिला आहे.
हेलीपॅड प्रस्ताव रात्रीतून गुंडाळल्याचे गमक काय?
दरम्यान, नशिक शहर मुंबई आणि पुणे शहरांनंतर सर्वाधिक द्रुतगतीने विकसित होणारे शहर असताना त्यामध्ये जलद दळणवळण सुविधेची भर पडल्यास विकासाचे ते एक पाऊल समजले जावे. प्रस्तावित हेलीपॅड त्याच अनुषंगाने उभारण्यात येणार होते. तथापि, हेलीपॅड संकल्पना एका रात्रीत गुंडाळण्यात आली. ही बाब आश्चर्यकारक व तितकीच धक्कादायक असल्याची नाशिकच्या उद्योग जगताची भावना आहे. त्याचा खुलासा एमआयडीसी नाशिक प्रशासनाने करावा, अशी मागणी कर्डक यांनी केली आहे.