नाशिक – कोरोनानंतरचा काळ प्रचंड बदल घडविणारा आहे. हा काळ म्हणजे पुढील १० वर्षांमध्ये होणाऱ्या बदलाची नांदी आहे. त्यामुळे परिस्थितीचे भान ठेवून बदलायला हवे, असे मत ‘उद्योगविश्व-२०२१ परिवर्तनातून प्रगतीकडे’ या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.
कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी मित्र मंडळाच्यावतीने ‘उद्योगविश्व २०२१’ या कार्यक्रमाचे सहावे पुष्प गुंफण्यात आले. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात पद्मश्री प्रतापराव पवार, चितळे ब्रदर्सचे संचालक गिरीश चितळे, उद्योजक राज मुछाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रतापराव पवार यांनी म्हटले की, पुढच्या दहा वर्षात प्रचंड बदल होणार आहेत. माणसाची जागा रोबोटिक्स तंत्रज्ञान घेणार आहे. नोकऱ्यांचे प्रमाण हे ८० टक्क्यांनी कमी होणार आहे. अशात परिस्थितीचे भान ठेवून बदलावे लागणार आहे. जर बदल स्विकारला नाही, तर पुढचा काळ हा नक्कीच सुलभ नसेल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. खर तर कुठलाही माणूस हा उद्योजक, विद्यार्थी, शिक्षक असतोच. मात्र जोपर्यंत तो चिकित्सकपणे विचार करीत नाही, तोपर्यंत त्याच्यातील गुणवत्ता दिसून येत नाही. डिजिटल युगाचा विचार करता प्रत्येकालाच चिकित्सक वृत्ती अंगी बाळगून स्पर्धेशी दोन हात करावे लागणार असल्याचेही प्रतापराव पवार यांनी सांगितले.
गिरीष चितळे म्हणाले की, ‘कोरोनामुळे सर्वच उद्योग-व्यवसायांना प्रचंड ताण सहन करावा लागला आहे. अर्थात ही स्थिती संपूर्ण जग व्यापून टाकणारी असल्याने, सर्वांनाच आतून मार्गक्रमण करावे लागत आहे. खरं तर जीवनाची ज्यांची धडपड संपलेली असते, त्यांनी प्रगतीची धडपड करावी, पुढे समृद्धीच्या मार्गावर जायचे ही परिक्रमा पूर्ण करण्याची कोरोनाने शिकवण दिली आहे. एकंदरीतच आता भरपूर संधी असून, त्याचा फायदा कसा करता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. तर राज मुछाळ यांनी सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्याला शंभर टक्के गुण मिळत नाही. मात्र जो यासाठी प्रयत्न करतो, तो शिक्षकांचा आवडता विद्यार्थी असतो. उद्योग-व्यवसायात अशीच परिस्थिती असते. जो शंभर टक्के देतो, तोच यशस्वी लोकांच्या यादीत जावून बसतो. आपण कोणाच्या रांगेत बसावे याचा विचार करून स्वत:च्या जीवनाला आकार देण्याची ही वेळ आहे. अर्थता त्याकरिता चिकित्सकवृत्तीने अभ्यास करण्याची वृत्ती अंगी बाळगावी लागणार आहे. कारण यातूनच नव्या संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच ‘समुद्राच्या किनाऱ्यावर मोती मिळत नाहीत. मात्र सिग्नल मिळतो, ज्यातून त्याचा शोध घेण्याचा मार्ग सापडत’ असल्याचेही मुछाळ म्हणाले.
सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष योगेश राणे यांनी केले . दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे सचिन बागड, राजेश कोठावदे, दिपक बागड, चंद्रकांत धामणे, भास्कर कोठावदे, अशोक सोनजे, गाेविद देव, जगदीश कोठावदे, महेश उदावंत, संजय शिरूडे, नितीन दहीवलकर, योगेश मालपुरे, योगेश राणे यांनी दिपप्रज्वलन केले. तसेच वास्तूविशारद विवेक जायखेडकर यांना उद्योग विश्व पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेत्री समीरा गुजर यांनी केले, तर आभारप्रदर्शन महेश पितृभक्त यांनी केले.