उत्स्फूर्त कलाविष्कार!
लोककलांमध्ये ठरवून नियोजनबद्ध असं काही केले जात नाही. उत्स्फूर्तता हा अनेक लोककलांचा प्राण आहे. त्यामुळेच कलाविष्कार रसरशीत, जीवंत भासतो.आदिवासी वारली कलाकार विविध विषयांवर उत्स्फूर्तपणे व सहजतेने चित्रांकन करतात. त्यासाठी साधे कच्चे रेखाटन किंवा रचना, मांडणीचे आरेखन केलेले नसते. काढलेली प्रत्येक रेषा ठाशीव व अंतिम असते. म्हणूनच त्यातील उत्स्फूर्तता मनमोहक ठरते.
निरागस मनातून उमटणाऱ्या या कलाविष्कारात दैनंदिन व्यवहार, जीवनशैली, सभोवतालचा परिसर, निसर्ग, पर्यावरण, रूढी – परंपरा, देवदेवता, शेती व रोजगाराची कामे यावर नकळतपणे भाष्य केलेले असते. वारली चित्रकला हा ये हृदयीचे ते हृदयी पोहोचवणारा मूकसंवाद आहे.वारली चित्रे बघून रसिक
आश्चर्यचकित व अंतर्मुख होतात.आदिवासी वारली चित्रकला रसिकांपर्यंत पोहोचली त्याला लवकरच ५० वर्षे पूर्ण होतील. मात्र या कलेला ११०० वर्षांची प्रदीर्घ व समृद्ध परंपरा आहे. वारली चित्रशैलीचा एकूण आवाका बघितला तर आपण थक्क होतो. ही चित्र परंपरा का आहे ? याचा विचार केला तर असे आढळते की, धनधान्याची समृद्धी यावी यासाठी ही चित्रे झोपडीच्या भिंतीवर रेखाटली जातात. त्याबरोबरच घरातील रोगराई, दैन्य जावे,भुताखेतांची बाधा टळावी यावरचा चित्ररेखाटन हा ते प्रभावी इलाज मानतात. या भित्तिचित्रांमुळे पूर्वजांच्या आत्म्याला सदगती मिळून त्यांना शांती लाभते, देवदेवता प्रसन्न होतात. दुष्ट नकारात्मक शक्तींचा नाश होतो अशी आदिवासी वारल्यांची दृढ श्रद्धा आहे.म्हणूनच ही कलापरंपरा थेट ११०० वर्षे टिकून आहे.
कलाकारांना साक्षात्कार होईल, स्फुरेल त्यानुसार ते उत्स्फूर्तपणे भिंतीवर चित्रे रंगवतात. गेरूने सारवलेल्या भिंतीवर पाण्यात कालवलेल्या तांदळाच्या पिठीने काढलेल्या वारली भित्तिचित्रांमध्ये काही काल्पनिक गोष्टी प्रकर्षाने दिसतात. ज्या पाड्यांजवळ नदी, नाला, तलाव, झरा आहे त्या पाड्यांवर झोपड्यांचा भिंतीवरील चित्रात कमळाचे फुल आवर्जून काढतात. पाण्याचे अस्तित्व असल्याचे ते निदर्शक आहे. तसे अन्यत्र दिसत नाही.
वारली चित्रशैलीत वास्तववादी चित्रांप्रमाणे प्रमाणबद्धता नसते. त्यांचे यथात्यदर्शन देखील स्वतंत्र,वेगळे आहे. एकाच प्रतलावर चित्र रेखाटलेले असते. तरीही वारली चित्रे बघणाऱ्या रसिकांच्या मनाला भिडतात.रेखाटनांंमधील उत्स्फूर्त कलाविष्कार मन मोहून टाकतो. मुक्तपणा, प्रवाहीपणा,आकारांची पुनरावृत्ती आणि आकृत्यांंचा जोरकसपणा ठोसपणे जाणवतो. एक वर्तुळ, दोन उलटसुलट त्रिकोण, काही ठिपके व वेगवेगळ्या रेषा यांनी कलाकृती तयार होते.त्यात मनुष्याकृती, प्राणी, पक्षी, झोपड्या,घरे, झाडे, निसर्गाच्या सानिध्यात असणारे विविध घटक यांचे आकार सहजपणे साकार होतात.
वारली चित्रणात ढोबळपणा असतो. माणसांचे नाक, डोळे, कान, तोंड असे कोणतेच तपशील नसतात. तरीही त्यात पूर्ण चैतन्य भासते.निसर्गदत्त मोकळेपणा असलेल्या आदिवासी बांधवांच्या चित्रातही याच मोकळेपणाचे प्रतिबिंब ठळकपणे पडलेले असते. आकारांचे सुलभीकरण करत वारल्यांचे सततच उत्स्फूर्तपणे रेखाटन सुरु असते. त्याला ते कलेचा आविष्कार किंवा आपण काही विशेष करतोय असे मानतच नाहीत. तो दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे अशीच त्यांची कल्पना असते. परमेश्वराने किंवा अज्ञात शक्तीने ते आपल्या हातून घडवून आणले असाच त्यांचा समज आहे. चित्रातील प्रत्येक आकृतीला मग तो माणूस असो किंवा पशुपक्षी त्यांना जीव आहे असेही त्यांना वाटते. त्यावरून त्यांचे जगण्याशी, चित्रकलेशी केवढे जिव्हाळ्याचे नाते आहे, कलेवर श्रद्धा आहे हे लक्षात येते. वारली चित्रशैली हा भोळ्याभाबड्या, निरागस आदिवासींच्या खडतर आयुष्यातील आनंदाचा ठेवा आहे. त्यांचे वेगळे साधेसुधे विश्व,रीतिरिवाज, सण- उत्सव, दैनंदिन जीवनातील प्रसंग, घटना थेट कुडाच्या भिंतीवर साकार होतात. त्यांचे जगणेही रानफुलांसारखे निखळ व मोकळेढाकळे असते. त्यात कलाकृती रंग भरतात. तेच विषय चित्रात उमटतात. त्यांचे प्रत्येक चित्र हे त्यांच्या भाबड्या मनावर
उमटलेले स्वतःच्या जगाचे प्रतिक असते. ही सारी संवेदनशील मनाची प्रतिक्षिप्त क्रियाच म्हणावी लागेल.
वारली चित्रातील आकार, रेषा प्रमाणबद्ध जरी नसल्या तरी कलाकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची कमाल वाटते. इतकी अप्रतिम चित्रे त्यांना सुचतात तरी कशी ? असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. वारली चित्रशैलीत मुक्त रेषा, त्यातून निर्माण होणारे आकार यांच्या गुंफणीला महत्त्व आहे. बऱ्याचदा आकारांची पुनरावृत्ती होते. त्यातून कलात्मक पातळीवर सौंदर्याची जाणीव कलाकार व रसिकांना होते. वारली चित्रकार भौमितिक आकारांशी अक्षरशः खेळत खेळत चित्रे रेखाटतात. साध्यासोप्या आकारातून बघताबघता बहारदार चित्र निर्माण होते. तसे ते तयार होताना बघणे हा विलक्षण अनुभव आहे. महिलांनी परंपरागत जपलेली ही अनोखी कला पुरुषांनी वेगवेगळे प्रयोग करून वेगळ्याच उंचीवर पोहोचवली आहे. जगाच्या कलात्मक नकाशावर विराजमान झाली आहे. निसर्ग व सृष्टीला समजून घेताना वारली कलाकार अधिक चौकस जिज्ञासू बनतात. त्यांना उमगलेले रहस्य सोपे करुन चित्रात मांडतात. त्यातून त्यांची कलेबद्दलची आस्था, कळकळ स्पष्ट होते. रसिकांना अंतर्मुख करते. मग रसिकांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे वाहवा उमटते.
पाठ्यपुस्तकात वारली कलेला स्थान
मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकात आदिवासी वारली चित्रकलेला स्थान मिळाले आहे. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीत आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी म्हणजेच शहरी संस्कृतीपासून मुक्त अशी वारली चित्रशैली आहे. परंपरागत निसर्गप्रेम व सहज उपलब्ध साहित्याचा वापर हे वारली कलेचे ठळक वैशिष्ट्य ! असे सोपे समीकरण धड्यात मांडलेले दिसते.प्रसिद्ध संशोधक, विचारवंत डॉ. गोविंद गारे यांनी या धड्याचे लेखन केले आहे. त्यांनी वारली कलेविषयी विपुल लेखन केले.
पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे ते संचालक होते. आगळ्यावेगळ्या आदिवासी संग्रहालयाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. तेथे वारली चित्रकलेचे स्वतंत्र दालन त्यांनी निर्माण केले.माझा त्यांच्याशी व्यक्तिशः परिचय होता. जिव्या सोमा मशे यांच्याकडे तेच मला डहाणूजवळच्या कलमीपाड्यावर घेऊन गेले. त्यामुळे मला वारली कलेच्या संशोधन करण्याची, पुस्तके प्रकाशित करण्याची प्रेरणा मिळाली. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या वारली कलेविषयी माहिती या धड्यात मिळते. सोप्या शब्दात डॉ. गारे यांनी वारली कलेचा छान परिचय करुन दिला आहे. मुलांमध्ये उपजत असणाऱ्या उत्स्फूर्त कलागुणांना त्यामुळे वाव मिळेल. कलाकार किंवा किमान उत्तम रसिक होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.