नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील डॉक्टर आणि परिचारकांसह १ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमधील एकूण ७१ केंद्रे लसीचा देण्यासाठी सज्ज झाली आहेत. यासंबंधी माहीती देताना नाशिक विभागातील कार्यवाहक उपसंचालक पी. डी. गंडल म्हणाले की, या पाचही जिल्ह्यातील प्रशासनाने या कार्यक्रमासाठी सरकारी व खासगी संस्थांमधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी अंतिम केली आहे. सर्वाधिक आरोग्य कर्मचारी अहमदनगर ३१८०० आणि नाशिक ३०,००० येथे आहेत. तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील संख्या अनुक्रमे १९,९११, १०,२०० आणि ११,३४६ अशी आहे. तसेच लसीकरण केंद्रांचा विचार करता नाशिकमध्ये सर्वाधिक २३, त्यानंतर अहमदनगर २१, जळगाव १३ आणि धुळे व नंदुरबार प्रत्येकी ७ आहेत. नाशिक जिल्ह्यातील २३ केंद्रांपैकी ५ केंद्रे नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. तसेच अहमदनगर शहरात ७, धुळे शहरात ३ आणि जळगाव येथे ४ केंद्रे आहेत.
पाचही जिल्हा प्रशासनाने नुकतीच लसीकरण कार्यक्रमासाठी ड्राईव्ह अॅण्ड रन मोहीम यशस्वीरित्या राबविली. नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड म्हणाले की, जिल्ह्यात लस साठवण्यासाठी सहा आइस-रेफ्रिजरेटर (आयएलआर) आहेत. तर धुळे जिल्हा कोविड -१९चे नोडल अधिकारी विशाल पाटील यांनी सांगितले की, लसीकरण केंद्रे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहतील . तसेच आरोग्य कर्मचार्यांना लसी घेण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेनुसार केंद्रांना भेट द्यावी लागेल. प्रत्येक लसीकरण केंद्राचे संचालन पाच सदस्यांचे पथक करेल. एकदा आरोग्य कर्मचारी केंद्रात दाखल झाल्यानंतर त्याला प्रतीक्षा कक्षात थांबावे लागेल आणि तेथे नावे, फोटो आयडी इत्यादीची पडताळणी प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानंतर सदर आरोग्य कर्मचाऱ्यास लसीकरण कक्षात प्रवेश देऊन लस दिली जाणार आहे.