चमोली (उत्तराखंड) – येथे आज सकाळी भूस्खलन झाल्यानं, धौलीगंगा नदीला अचानक पूर आला. या पुरामुळे तपोवन परिसरातल्या रैणी गावाजवळच्या ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं आहे. याशिवाय नदीपात्राजवळच्या गावांमधल्या घरांचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
भूस्खलनानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, तसंच भारत तिबेट सीमा पोलीस दलाचं, तर भुस्खलनामुळे आलेल्या पुरानं प्रभावित झालेल्या हरिद्वार परिसरात, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून बचाव आणि मदत कार्य सुरु आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत १४० जण बेपत्ता असल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकार योग्य ती पावलं उचलत आहे, तसंच सध्या पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
ऋषिगंगा धरणाच्या ठिकाणाहून १७ जण बेपत्ता असल्याचं पोलीस महानिरीक्षक अशोक कुमार यांनी सांगितलं. सध्या पुराचं पाणी श्रीनगर धरणात स्थिरावलं असल्यानं, धोका कमी झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला शक्य ते सर्व सहकार्य केलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. ते आज महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलत होते. हवाई दलाला सज्ज राहण्याचा इशाराही दिला असल्याचं ते म्हणाले.
या घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.व्यंकैय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
नदीची पाणी पातळी कशी वाढली त्याचे बघा हे दोन व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1358298567287267329
https://twitter.com/roshangaur/status/1358360752990662656