डेहराडून ः उत्तराखंडमध्ये रविवारी झालेल्या जलप्रपातानंतर एनडीआरएफ, आयटीबीपी आणि एसएसबीच्या पथकांकडून बचावकार्य वेगानं सुरू आहे. चमोली इथल्या बोगद्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम बचाव पथकांकडून सुरू आहे, असे चमोली पोलिसांनी सांगितले आहे. बोगद्यामध्ये जाऊन जेसीबीच्या सहाय्यानं रस्ता खोदण्याचं काम केले जात आहे. आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात आले असून, १४ जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणांहून काढण्यात आले आहेत. बोगद्यामध्ये अजूनही ४० ते ५० नागरिक फसले आहेत.
एनडीआरएफचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितलं, की २.५ किलोमीटर असलेल्या बोगद्यामध्ये बचावकार्य सुरू आहे. पाण्यामुळे वाहून आलेला गाळ आणि डेब्रिज सर्वात मोठा अडथळा असून तो हळूहळू स्वच्छ होत आहे. या दुर्घटनेत २७ जिवंत नागरिक, मृत ११ आणि १५३ बेपत्ता झाले आहेत. १५३पैकी ४०-५० बोगद्यामध्ये अडकले आहेत. उर्वरित नागरिक उत्तराखंडमध्ये वाहून गेल्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री पोखरियाल निशंक यांची पाहणी
केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले, की ही सर्वात कठिण परिस्थिती आहे. परंतु आयटीबीपीच्या पथकानं एका बोगद्यातून नागरिकांना यशस्वीरित्या वाचवलं आणि आता ३ किलोमीटर लांबीच्या दुस-या बोगद्यात बचावकार्य सुरू केलं आहे. एनडीआरएफ आणि लष्करसुद्धा या कामात गुंतले आहेत. दुपारपर्यंत आम्ही सकारात्मक गोष्टी घडतील अशी आशा करत आहोत.
श्रीनगर धरणाजवळ शोधकार्य सुरू
एसडीआरएफ आणि उत्तराखंड पोलिसांच्या पथकाकडून श्रीनगर धरणाजवळ शोधकार्य सुरू आहे,
इंजिनिअर टास्क फोर्ससह लष्करी जवानांच्या प्रयत्नानंतर बोगद्याच्या तोंडाजवळ स्वच्छता राबवण्यात आली. जनरेटर आणि लाईटच्या सहाय्यानं रात्रीपर्यंत काम सुरू होते. तपोवन क्षेत्रात फसलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याची आमची प्राथमिकता आहे. जी गावे, परिसर या दुर्घटनेमुळे वेगळे झाले आहेत, तिथे युद्धपातळीवर काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितलं.