नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या एकूण ३६०६ शेतकरी बंधू भगिनींची रिसोर्स बँकेच्या यादीचे अनावरण कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते दिनांक जुलै २०२० मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथे झाले. याबरोबरच विविध कृषि पुरस्कार विजेते व पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत एकूण ५००९ शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार झाली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषि विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून सद्यस्थितीत काही शेतकरी अभिनव उपक्रम/ तंत्रज्ञान/ सुधारित शेती पध्दत वापरून उत्पादन व उत्पन्न वाढ करत आहेत. अशा शेतकऱ्यांचा आदर्श इतरांपुढे ठेवणे, कृषि विभागाने त्यादृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे व अशा अभिनव उपक्रमशील शेतकऱ्यांबरोबरच विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देणे या उद्देशाने रिसोर्स बँक तयार करण्यात आली आहे.
कृषि सहाय्यकांनी त्यांच्या गावातील शेतकऱ्यांचा व्हॉटस ग्रुप तयार करुन त्यात रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. त्यामधून विविध पिकांचे तंत्रज्ञान, वाणांची निवड, खतांची मात्रा, कीड रोग प्रादुर्भाव व नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कृषि विभागाचा योजना व शेतमालाचे विपणन इत्यादी गोष्टींबाबत मार्गदर्शनासाठी अशाच प्रकारचा व्हॉटस ग्रुप देखील तालुकास्तरावर स्थापन झाला असून याशिवाय राज्यातील सर्व जिल्ह्यातील रिसोर्स बँकेतील शेतकरी तसेच कृषि विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांचे जिल्ह्रानिहाय व्हाट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आलेले असून त्याव्दारे शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.