भास्कर सोनवणे, इगतपुरी
इगतपुरी – प्रशासनाची दिशाभूल करून जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवणाऱ्या घोटी खुर्द ( ता. इगतपुरी ) येथील पदच्युत थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. नाशिकच्या जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्याने त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी मंदाकिनी गोडसे यांच्याविरोधात दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी झाला आहे. आधीच पदच्युत झालेल्या असल्याने मंदाकिनी गोडसे यांचे थेट सरपंचपद न्यायालयीन आदेशाने संपुष्टात आले आहे. यासह राज्यातील जातपडताळणी समित्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या जातपडताळणी प्रस्तावांची तपासणी करून निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने ८ महिन्यांचा कालावधी आदेशात ठरवून दिला आहे. कायद्याप्रमाणे जलद प्रक्रिया केल्यास निवडणूक विवाद कमी करण्यास मदत होण्यासाठी राज्य सरकारला सुद्धा आदेशीत करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील अत्यंत संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच मंदाकिनी गोडसे यांचे कुणबी जातीचे जातप्रमाणपत्र रद्द खोट्या पुराव्यांच्या आधारावर काढण्यात आल्याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी तक्रार केली होती. विविध पुराव्यांच्या आधारावर गोडसे यांचे पद रद्द करण्याची त्यांची मागणी होती. त्यानुसार नाशिकच्या जातपडताळणी समितीने मंदाकिनी गोडसे यांच्या प्रकरणी सविस्तर चौकशी करून न्यायालयीन कामकाज केले. समितीच्या आदेशानुसार मंदाकिनी गोडसे यांचा इतर मागास प्रवर्गातील कुणबी जातीचा दावा अवैध झाल्याचा आदेश नाशिकच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, सदस्य माधव वाघ, सदस्य सचिव संगीता डावखर यांच्या त्रिसदस्यीय समितीने दिला होता. त्यानुसार नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मंदाकिनी गोडसे यांना सरपंच पदावरून पदच्युत केले. याविरोधात सौ. गोडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून समितीचा निर्णय कायम केला असल्याने अखेर त्यांची पदावरून गच्छंती झाली आहे.
घोटी खुर्द येथील मंदाकिनी गोडसे यांनी थेट सरपंचपदाचे नामनिर्देशन पत्र भरताना कुणबी जातीचे नसतांनाही खोटे पुरावे, खोटे प्रतिज्ञापत्र व घोषणापत्र सादर केले होते. जात प्रमाणपत्र काढतांना खोटी वंशावळ जोडून कुणबी जातीचा खोटा दाखला मिळवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तींच्या जातीच्या पुराव्यांचा गैरवापर केला होता. याबाबत तक्रारदार माजी ग्रामपंचायत सदस्य आत्माराम फोकणे यांनी भक्कम पुरावे सादर केले होते. समितीच्या निर्णयाविरोधात मंदाकिनी गोडसे यांनी केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळण्यात आल्याचा आदेश पारित केला. आदेशात त्यांनी राज्यातील समित्या आणि महाराष्ट्र शासनाला विविध सूचनावजा आदेशही दिले आहेत.
राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या घोटी खुर्द ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद पूर्वलक्षी प्रभावाने रद्द झाले आहे. श्री. फोकणे यांच्यातर्फे अॅड. दत्ता निकम यांनी जात पडताळणी समितीकडे आणि अॅड. सचिन गीते यांनी मुंबई उच्च न्यायालयात कामकाज पाहिले.
आदेशाचे मी स्वागत करतो
माझ्याकडील भक्कम पुराव्यांच्या बळावर न्यायदेवतेने मंदाकिनी गोडसे यांचे पितळ उघडे पाडले. शेवटी सत्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. आता अनेक मुद्यांवर न्याय मिळावा म्हणून कायदेशीर लढा देणार आहे. हा विजय सर्व ग्रामस्थांचा आहे असे मी समजतो. न्यायदेवतेच्या आदेशाचे मी स्वागत करतो.
– आत्माराम फोकणे, तक्रारदार