मुंबई – महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या कोव्हीड टास्क फोर्सने राज्यात कडक लॉकडाऊनची शिफारस केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील त्याच पार्श्वभूमीवर इशारा देणारा संदेश राज्यातील नागरिकांना दिला. लोक नियम पाळत नसल्यामुळे लॉकडाऊनचा विचार करावा लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. परंतु, लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाबाबत सरकारमध्ये उघड मतभेद होत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या विचाराशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नाही. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. त्यांनी दुसऱ्यांदा लॉकडाऊन योग्य नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी विचार करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. कोरोनाचे वाढते रुग्ण बघता प्रशासनाना तयारीत राहायला सांगितले आहे, पण त्याचा अर्थ लॉकडाऊन लावणे हा काही पर्याय नाही. लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊनपासून सुटका करून घेणे शक्य आहे, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी अर्थव्यवस्थेला कमित कमी फटका बसेल अशी योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. अलीकडेच झालेल्या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी खाटांची संख्या, आक्सीजन पुरवठा आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासण्याची भिती मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. अश्यात रुग्णसंख्या वाढत राहिली तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
सोमवारी कोरोनामुळे देशभरात 291 लोकांचा मृत्यू झाला. त्यातील 102 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत. तर महाराष्ट्रात सोमवारी 31 हजार 643 नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली. देशातील एकूण रुग्णवाढीत 60 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे.