नवी दिल्ली – पाकिस्तानमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणार्या जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांना जिहादी आणि फुटीरतावादी मानसिकतेला पाकिस्तान सरकार प्रोत्साहन देत असल्याचं उघड झालं आहे. अशा प्रकारे पाकिस्तान भारतविरोधी अजेंडा राबवत असून, या कटाचा पर्दाफाश राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) केला आहे.
दहशतवादी, हुर्रियत आणि पाकिस्तान
दहशतवाद्यांना पैसे पुरवण्याच्या एका प्रकरणात एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं की, दहशतवादी, हुर्रियत कॉन्फरन्स आणि पाकिस्तान सरकार यांची त्रिपक्षीय युती आहे. हे लोक पाकिस्तानबद्दल सहानुभूती असलेल्या काश्मिरी डॉक्टर, अभियंत्यांचा गट तयार करत आहेत.
व्हिसा सहज उपलब्ध
कट्टरवादी हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी आणि उदारवादी हुर्रियत नेते मीरवाईज मौलवी उमर फारुक आणि त्यांचे इतर साथीदार काश्मिरी विद्यार्थ्यांना पाकिस्तानात शिक्षणासाठी प्रवेशाची व्यवस्था करून देतात. त्यांच्या शिफारशीवरून विद्यार्थी व इतर लोकांना पाकिस्तानचा व्हिसा सहजरित्या मिळवून देतात.
दहशतवाद्यांशी संबंध
जे विद्यार्थी पाकिस्तानात शिक्षणासाठी गेले आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश विद्यार्थी माजी दहशतवाद्याचे नातेवाईक किंवा सक्रिय दहशतवाद्यांशी जोडले गेलेले आहेत, असं तपासात उघड झालं आहे. त्याशिवाय काही हुर्रियत नेते काश्मिरातील काही प्रभावी कुटुंबांतील मुलांना पाकिस्तानात वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश देण्याआडून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतात. या रकमेतील मोठा हिस्सा दहशतवादी आणि फुटीरतावादी कारवायांसाठी खर्च केला जातो.
दस्तऐवजांमुळे भांडाफोड
एनआयएनं न्यायालयात सांगितलं की, फुटीरतावादी नेते नईम खान यांच्या घराच्या झडतीदरम्यान काही दस्तऐवज मिळाले. पाकिस्तानात एका विद्यार्थ्याला एमबीबीएसच्या प्रवेशासाठी शिफारसीसंदर्भात ते कागदपत्र होते. त्यामध्ये एका विद्यार्थ्याबद्दल सांगण्यात आलं की, तो आणि त्याचे कुटुंब पाकिस्तान समर्थक आहेत. काश्मीरच्या स्वातंत्र्याप्रति ते संकल्पबद्ध आहेत.
फुटीरतावाद्यांचे दुकान बंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करून यासंदर्भातील यंत्रणेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये वैद्याकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर हुर्रियत नेत्यांनी शिक्षणासाठी उघडलेलं प्रवेश देण्याचं दुकानच बंद झाल्यानं ही संख्या नावापुरतीच राहिली आहे.
राज्य सरकारकडून कधीच दखल नाही
हुर्रियत, दहशतवादी आणि पाकिस्तान सरकार काश्मिरी विद्यार्थ्यांचा उपयोग करून घेत असल्याची माहिती काश्मिरच्या तत्कालीन सरकारला होती. परंतु कोणीही हे रोखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पाकिस्तानी अजेंड्याला प्रोत्साहित करण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या विद्यार्थ्यांना भाग पाडलं जात होतं.