मुंबई – कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु झालेल्या ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत सहा हजारापेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडीदेखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी ९.३० ते दु.१.३० या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता त्यात वाढ करुन दु.३ ते सायंकाळी ५ या वेळेतदेखील ओपीडी सुरु असणार आहे. या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप देखील सुमारे चार महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. ॲण्ड्राईड आधारित ॲप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोनधारकांना होत आहे.
राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत ६०७२ जणांनी यासेवेचा लाभ घेतला, आहे.
ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक:
https://play.google.com/store/
ई-संजीवनी ओपीडी ॲप :
- मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.
- लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.
- डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रिप्शन प्राप्त होते.