नाशिक – ई- वे बिल प्रणालीतील २४ तासात १०० किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन व जीएसटी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील बिलातील तरतुदीत करण्यात आलेला महत्त्वाचा बदल दि.१ जानेवारी २०२१ पासून लागू झाला. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते. त्यानुसार प्रत्येक १०० किलोमिटरला एक दिवस वाढत जात असे, मात्र नव्या नियमात बदलानुसार १०० ऐवजी २०० किलोमीटर प्रतिदिन असा कालावधी देण्यात आला आहे. एक हजार किलोमीटर करिता या नियमानुसार पाच दिवस मिळत असून त्याचा कालावधी संपला तर ऑनलाइन त्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तरतुदीमुळे गैरप्रकारांना आळा बसणार असता तरी यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मात्र अडचणीत आला असल्याचे म्हटले आहे.
तसेच जीएसटीचा महत्त्वपूर्ण भाग असलेले ई वे बिलही लागू केले आहे. त्यानुसार ५० रुपयांपेक्षा जास्त चा माल दहा किलोमीटरपेक्षा जास्त दूर वाहतूक करण्यासाठी हे बिल अत्यावश्यक आहे. जीएसटी त्या वस्तूंवर कर आकारलेला आहे त्या वाहतूक करण्यासाठी हे गरजेचे आहे. यात वेळोवेळी बदल जीएसटी परिषदेने केले असून एक जानेवारी २०२१ पासून १०० ऐवजी २०० किलोमीटर प्रतिदिन यानुसार ई वे बिल तयार करावे लागत आहे. मात्र यातून अडचणी निर्माण होत असून काही घटनांमध्ये ड्रायव्हरकडून वाहन पोहोचण्यास उशीर झाला तरी दंड आकारण्यात येत आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायिक व उद्योजकांना बसत असल्याचे म्हटले आहे.
पुढे म्हटले आहे की, एकीकडे जागतिक मंदी आणि त्यानंतर गतवर्षी कोरोनाचे संकट यातून सावरत आता कुठेतरी उद्योग व्यवसाय सुरळीत होत असताना अशा अडचणी उभ्या राहिल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना अर्ध्या गाडीचा मालक असल्याने दुसरा माल जमा करायला वेळ लागतो. यामुळे भाडे विभागले जाते याचा फायदा उद्योजकांना मिळतो. या तरतुदीमुळे अनेक जणांचा माल एकाच गाडीत एकत्र करून वेळेत पोहोचणे अडचणीचे ठरत असून यामुळे संबंधित त्याचे भाडे इंधन वाया जात आहे. तसेच माल वाहतूक करतांना वाहनास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यांना हे अंतर वेळेत पार करणे अवघड होते. त्यामुळे याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच उद्योजकांना बसत आहे. त्यामुळे ई- वे बिल प्रणालीतील २४ तासात १०० किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन पी.एम.सैनी यांनी केली आहे