नाशिक : ई मेल अॅड्रेस बदलायचा आहे अशी रिक्वेस्ट पाठवून सायबर चोरट्यांनी नोकरदार तरूणीच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत दोन लाख रूपयांची रोकड परस्पर लांबविण्यात आली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फसवणुक आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा येथील २६ वर्षीय तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सदर तरूणी शहरात नोकरीस असून ती मेरी येथील एका महिला वसतीगृहात वास्तव्यास आहे. या तरूणीचे स्टेट बॅक आॅफ इंडियाच्या म्हसरूळ शाखेत बचत खाते असून ती गेल्या रविवारी (दि.२०) आपल्या गावी गेली असता ही घटना घडली. अज्ञात सायबर चोरट्यांनी बँकेस ई मेल अॅड्रेस बदलायचा आहे असे रिक्वेस्ट पाठवून हा डल्ला मारला. यासाठी नव्याने ई मेल अॅड्रेस पाठविण्यात आला होता. बँकेने नवीन ईमेल अॅड्रेस बचत खात्याशी संलग्न केला असता नेट बँकीच्या माध्यमातून भामट्यांनी तरूणीच्या खात्यातील रकमेतून वेगवेगळय़ा वस्तू खरेदी केली तसेच एटीएमच्या माध्यमातून तब्बल १ लाख ९७ हजार ९७१ रूपये परस्पर काढून काढून घेतले. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढोकणे करीत आहेत.
…