नाशिक – नाशिकमध्ये ई कोर्ट प्रकल्प सुरू झाल्याने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने वकीलांसाठी अनोखी योजना आणली आहे. या योजनेची नोंदणी सुरू झाली असून त्याचा अधिकाधिक लाभ वकीलांनी घ्यावा, असे आवाहन कौन्सिलने केले आहे.
नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयाचा पहिला ई कोर्ट प्रोजेक्ट नाशिकमध्ये कार्यन्वित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे उदघाटन झाले आहे. अशाच प्रकारचे ई-कोर्ट प्रोजेक्ट महाराष्ट्रभर आणि देशभर सुरू करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या ई कोर्टस कमिटीचा मानस आहे. त्याचे निमित्त साधून सर्व वकील बंधू-भगिनींना उत्कृष्ट लॅपटॉप यापुढे आवश्यक झालेला आहे. जितका चांगला लॅपटॉप तितक्या चांगल्या प्रकारे भविष्यात इंटरनेटद्वारे कोर्ट कामकाज करता येणार असल्याचे अॅड अविनाश भिडे यांनी सांगितले आहे. याचा विचार करून सर्व वकिलांना उत्तम लॅपटॉप खरेदी करता यावा यासाठी दि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी लॅपटॉप योजना २०२० आणल्याचे कौन्सिलचे अॅड अविनाश भिडे यांनी सांगितले आहे. या योजनेमध्ये नामांकीत कंपनीचे लॅपटॉप सवलतीच्या दरात वकीलांना खरेदी करता येणार आहेत. लॅपटॉप खरेदीकरिता बँकेकडून कर्जाची उपलब्धता देखील केली जाणार आहे. इच्छूक वकीलांनी गुगल फॉर्म भरून सबमिट करुन माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अॅड जयंत जायभावे यांनी सांगितले आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अर्ज भरावा, असे आवाहन अॅड सुधीर कोतवाल यांनी केले आहे.