नवी दिल्ली – तंत्रज्ञानाने आपले जगणे व्यापले आहे. अनेक गोष्टी एका क्लिकवर आणि फोनवर शक्य झाल्या आहेत. मात्र याच तंत्रज्ञानाने विशेषतः ऑनलाईन मार्केटमुळे सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. अलीकडेच एका तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने हजारो लोकांना गंडवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अमेझॉन व स्मार्ट मार्टसारख्या मोठ्या कंपन्यांची फ्रांचाईजी देण्याच्या नावाखाली शितल शर्मा (२३) या तरुणीने ही फसवणूक केली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने तिला अटक केली आहे. मुख्य म्हणजे शितल शर्मा मुळची इंदूरची असून तिने बीबीए केले आहे. यावरून सुशिक्षित तरुणांचा सायबर गुन्ह्यांमधील सहभाग वाढत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
शितलने जवळपास एक हजार लोकांना ठगविल्याचे कबूल केले असले तरीही प्रत्यक्ष तक्रारी त्या तुलनेत कमी आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी स्मार्ट मार्ट कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात आपल्या कंपनीला मिळतीजुळते बनावट संकेतस्थळ कुणीतरी सुरू केले आहे अशी तक्रार याचिकेत करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशांवरूनच दिल्ली सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता. चौकशीचे सत्र सुरू झाल्यानंतर अनेक खुलासे होत गेले. हे संपूर्ण रॅकेट मध्य प्रदेशमधील इंदूरमधून चालविले जाते. यासाठी बनावट पत्त्यांच्या आधारावर मोबाईल नंबर्स घेण्यात आले.
अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्या असून यात स्मार्टमार्टसह स्नॅपडील, अमेझॉन, नापतोल, हेल्थ केअर आदींचा समावेश आहे. फ्रेंचाईजी देण्याच्या नावावर ५० हजार रुपये मागायचे आणि पैसे मिळताच मोबाईल नंबर बंद करायचा, असा प्रकार गुन्हेगार करीत आहेत. अशापद्धतीने एक हजारपेक्षा अधिक लोकांना गंडविण्यात आले आहे.