नाशिक – सक्तवसुली संचलनालयाद्वारे (ईडी) मुंबईत सुरु असलेल्या कारवाईचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याची बाब समोर आली आहे. ईडीचे पथक गुरुवारी (२६ नोव्हेंबर) नाशिकमध्ये दाखल झाले. या पथकात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्र्यंबकरोडवरील जिल्हा परिषद मुख्यालयासमोर असलेल्या सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेत काही व्यवहारांची चौकशी केल्याचे समजते. त्यानंतर त्यांनी या पतसंस्थेतील काही दस्तावेज ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. या पतसंस्थेच्या कारभाराची दखल घेऊन सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती यापूर्वीच केली आहे. मुंबईतील अनेक बाबींचे धागेदोरे या पतसंस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी ईडीचे पथक नाशकात दाखल झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.