मुंबई – ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची ४ कोटी २० लाखाची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याअगोदर चौकशी सुरू असतानाच त्यांनी पैशांचा अनधिकृतरित्या मोठा व्यवहार केल्याचे पुरावे अंमलबजावणी संचालनालयाच्या हाती लागले होते, त्यामुळे त्यांच्यावर मनी लाँड्रिगच्या आरोपाखाली चौकशीचा फासही आवळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात आज ईडीने ही कारवाई केली.
ईडीने यापूर्वी केलेल्या चौकशीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील एका ट्रस्टला दिल्ली येथील बनावट कंपन्यांनी ४.१८ कोटी रुपये दान दिले. त्यापूर्वी ही रक्कम कंपन्यांना हवालाद्वारे पाठविण्यात आली होती. मुंबईतील विविध ऑर्केस्ट्रॉ बार मालकांकडून देशमुख यांना हा पैसा मिळाला होता असे आढळून आले होते.
दिल्लीत ११ बनावट कंपन्या
वाझे यांनी डिसेंबर २०२० पासून फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान विविध बार मालकांकडून ४.७० कोटी रुपये वसूल केले होते. देशमुख यांचे सहाय्यक कुंदन शिंदे यांना ही रक्कम दोन टप्प्यात दिली. कुंदन शिंदे आणि देशमुख यांचे पुत्र हृषीकेश देशमुख यांच्याद्वारे ही रक्कम दिल्लीतील ११ बनावट कंपन्यांना हवालामार्फत पाठविण्यात आली. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील श्री साई शिक्षण संस्थेच्या ट्रस्टला ४.१८ कोटी रुपये पाठविण्यात आले. ईडीने या ११ बनावट कंपन्यांची पूर्ण माहिती घेतली होती. दिल्लीतील या कंपन्यांचा कोणताच व्यवसाय सुरू नसल्याचेही समोर आले होते. या कंपन्यांचा वापर फक्त पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी केला जात होता हेही उघड झाले होते.
आतापर्यंत ईडीने केलेली कारवाई
देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना यापूर्वीच अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीच्या अधिका-यांनी पैसे देणा-या बार मालकांचेही जबाब नोंदविले आहेत. तसेच दिल्लीतील त्या कागदी कंपन्यांच्या मालकांचेही जबाब नोंदविले आहेत. २५ जूनला अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांतर्फे चालविल्या जाणा-या सहा कंपन्यांचे संचालक तसेच शेअरधारकांच्या मुंबई, नागपूर, अहमदाबाद आदी सहा ठिकाणांवर छापे मारून अनेक लोकांचे जबाब नोंदविले आहेत.
…