पुणे – येथील ‘एमआयटी विद्यापीठा’शी नाशिकमधील ‘ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स’ या आयटी कंपनीने सहकार्य करार केला आहे. तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी उपलब्ध होणे तसेच शिक्षण व शैक्षणिक वातावरण यांच्यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात येत असल्याचे ‘ईएसडीएस’ने म्हटले आहे.
‘क्लाऊड कम्प्युटिंग’च्या क्षेत्रातील ‘इएसडीएस’ आणि ‘एमआयटी विद्यापीठा’ने एक विद्यार्थी-केंद्रित उपक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. याद्वारे, इएसडीएस आपले ‘क्लाऊड कम्प्युटिंग’ व ‘इमर्जिंग टेक्नॉलॉजी’मधील (उदयोन्मुख तंत्रज्ञान) कौशल्य ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांना देऊ करील.
विद्यार्थ्यांसाठी ठोस व्यासपीठ तयार करण्यासाठी आणि त्यांना उद्योग-सज्ज करण्यासाठी मूल्याधारित “युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीम” च्या माध्यमातून “कल्चर ऑफ पीस” ची संकल्पना विद्यापीठ राबवित आहे. हा करार त्याचाच एक भाग आहे.
असा होणार फायदा
– ‘इएसडीएस’चे तज्ज्ञ त्यांच्या अभिनव ‘पेटंट क्लाऊड’ तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना ज्ञान देतील. विद्यार्थ्यांना ‘क्लाऊड-रेडी’ राहता येईल, असा उद्योगक्षेत्राच्या दृष्टीकोनातून तयार केलेला अभ्यासक्रम याकरीता उपयोगात आणण्यात येईल.
– उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ‘ईएसडीएस’ ‘एमआयटी’शी हातमिळवणी करेल.
– ‘एमआयटी’कडून निवडण्यात आलेल्या स्टार्टअप्सना बाजारपेठेत प्रवेश मिळावा, यासाठी ईएसडीएस आपला फ्लॅगशिप मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म ‘स्पोकहब’ हा उपलब्ध करून देईल.
– दोन्ही संस्थांमध्ये भागीदारी झाल्याच्या निमित्ताने, ‘एमआयटी’कडून आलेल्या स्टार्टअप्सना इएसडीएस आवश्यक पायाभूत सुविधा प्रदान करील.
– प्रतिभावान विद्यार्थ्यांना ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून बाजारामध्ये नाव मिळवून देण्यास मार्ग तयार करेल आणि ग्राहकही मिळविण्यातही त्यांना मदत करेल.
—
“कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी आपल्याला ‘ट्रान्सफॉर्मेशन’, ‘टाइम’ आणि ‘टेक्नॉलॉजी’ या तीन ‘टी’ची गरज असते. आमच्या भागीदारीतून हे उपलब्ध असल्याचे आम्ही सुनिश्चित करू. त्यातून विद्यार्थ्यांच्या हितासाठी डिजिटल परिवर्तनास चालना मिळेल. योग्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य वेळी आणलेले परिवर्तन फार महत्वाचे असते.”
– किशोर शहा, प्रमुख, संशोधन विकास विभाग, ईएसडीएस
—
यावर्षी आम्ही ‘बी.टेक इन क्लाऊड कम्प्यूटिंग’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. आम्ही या स्पेशलायझेशनची सुरुवात ‘इएसडीएस’च्या सहकार्याने करणार आहोत. या आघाडीमध्ये ती उद्योग-संबंधित भागीदार असेल.
– प्रा. सुनीता एम. कराड, संचालिका, एमआयटी