बगदाद – इराकमध्ये २१ दहशतवादी आणि मारेकऱ्याना फाशी देण्यात आली. इराकच्या अंतर्गत मंत्रालयाने एक निवेदन जारी करत ही माहिती दिली. दक्षिणेकडील इराकमधील नासिरिया या तुरूंगात फाशी देण्यात आली. यामध्ये अफगाणिस्तानचे उत्तरी शहर ताल अफार येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यांमध्ये सामील असलेल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये बरेच लोक ठार झाले होते. या निवेदनात फाशी झालेल्या लोकांची ओळख किंवा त्यांच्यावर दोषी ठरविलेले गुन्हे उघडकीस आले नाहीत.
२०१४ ते २०१७ या काळात अमेरिकन समर्थक लष्करी कारवाईत इस्लामिक स्टेटचा पराभव झाल्यापासून शेकडो संशयित जिहादींवर इराकमध्ये खटला चालविण्यात आला आहे. मानवाधिकार संघटनांनी इराकी आणि इतर प्रादेशिक शक्तींवर न्यायालयीन प्रक्रियेत विसंगती असल्याचा आरोप लावला आहे. २०१४मध्ये इस्लामिक स्टेटने इराकचा एक तृतीयांश भाग ताब्यात घेतला, परंतु तीन वर्षांत इराक आणि शेजारच्या सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात पराभूत झाला.
सिरिया आणि इराकमधून विखुरल्या नंतर इस्लामिक स्टेट म्हणजेच आयएस या दहशतवादी संघटनेने आपली रणनीती बदलली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, इस्लामिक स्टेट आता दक्षिण आशियामध्ये पाय ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानमध्येही त्याचे पूर्ण संरक्षण मिळत आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ४५व्या अधिवेशनाबाहेर आयोजित वेबिनारमध्ये तज्ञांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती चिंताजनक मानली. तज्ज्ञांनी सांगितले की अफगाणिस्तानात तालिबानात विभक्त झालेले काही कमांडर आयएसमध्ये सामील होऊन सैनिकांची भरती करीत आहेत.