नवी दिल्ली – भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) म्हणजेच इरडा एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून त्यात म्हटले की, आरोग्य विम्याच्या बाबतीत जर विमा कंपन्यांनी दावा फेटाळला तर त्यांना विमाधारकाला स्पष्ट कारण द्यावे लागेल. तसेच कंपन्यांनी सुनिश्चित केले पाहिजे की, कोणताही विम्याचा दावा हा फक्त पूर्वगृह किंवा पूर्व अनुमानाच्या आधारे काढून टाकला जाऊ नये. कारण त्यामुळे विमाधारकांचे नुकसान होऊ शकते.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) परिपत्रक ‘हेल्थ इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट’ परिपत्रकात आरोग्य विमा दाव्यांचा तोडगा काढण्याच्या प्रक्रियेत विमा कंपन्यांना अधिक पारदर्शक होण्यासाठी सांगितले आहे.
सर्व विमा कंपन्यांना विमा प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे, ज्याद्वारे विमाधारकास हक्क सांगण्याच्या विविध टप्प्यांबाबत पारदर्शक पद्धतीने माहिती दिली जाऊ शकते.
तसेच इरडाने म्हटले की, सर्व विमा कंपन्यांना एक वेगळी व्यवस्था विकसित करावी लागेल जेणेकरुन विमाधारकास कॅशलेस ट्रीटमेंट, विमा कंपनी, टीपीएमध्ये वेबसाइट, पोर्टल, अॅपद्वारे किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मार्गाने दाखल केलेल्या दाव्यांच्या स्थितीबद्दल माहिती मिळू शकेल. त्यात अर्जाच्या काळापासून दाव्यांचा तोडगा काढण्यापर्यंतची संपूर्ण माहिती असावी.
जर टीपीए विमा कंपनीच्या वतीने दावा निकाली काढत असेल तर विमाधारकाला सर्व माहिती द्यावी लागेल. याबाबतचे सदर परिपत्रक जीवन विमा, सामान्य विमा, एकल आरोग्य विमा कंपन्या आणि टीपीए यांना देण्यात आले आहे.