मुंबई – बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे.
त्यानुसार शासनाने १३ ऑक्टोबर २०१६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी अशा सूचना क्षेत्रीय स्तरावर देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षक व विशेष शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सदस्य कपिल पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या विधान परिषदेत बोलत होत्या. यासंदर्भात आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.