नवी दिल्ली – भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्याने असे डिव्हाईस तयार केले आहे, ज्याच्या आधाराने इमारतीत लपलेला दहशतवादी शोधून काढणेही सोपे होणार आहे. या डिव्हाईसचे नाव मायक्रोकॉप्टर आहे आणि दहशतवाद्यांवर नजर ठेवण्याच्या उद्देशानेच ते तयार करण्यात आले आहे.
मायक्रोकॉप्टर हे डिव्हाईस लेफ्टनंट कर्नल जीव्हायके रेड्डी यांनी बनविले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पॅरा स्पेशल फोर्सेस बटालीयनने याचा यशस्वी प्रयोगदेखील करून बघितला. अर्थात, यात आणखी काही सुधारणा केल्या जात आहे. भारतीय सेनेने सीमेवरील देखरेखीसाठी स्वीच ड्रोन मिळविण्याकरिता एक करारही केला आहे.
आयडिया फोर्जचे मोहित बंसल यांनी दिलेल्या माहितीनुसार टेक आफ आणि लँडिंग ड्रोनमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार मीटरच्या उंचीवर उड्डाण घेण्याची क्षमता आहे. या फर्मने काही वर्षांपूर्वी डीआरडीओसोबत नेत्रा ड्रोनदेखील तयार केले होते. हे डिव्हाईस दिल्लीत भारतीय सेनेद्वारा इंटरनॅशनल इनोव्हेशनसाठी आयोजित एका कार्यक्रमात दाखविण्यात देखील आले होते.
जम्मू-काश्मीकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी घटनांची संख्या वाढत आहे. अशात हे डिव्हाईस अत्यंत उपयोगाचे ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये एन्काऊंटरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, हे विशेष.