मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळा व महाविद्यालये सुरु करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावर उपाय म्हणून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रम सुरु होणार असल्याची माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. ऑक्टोबरपासून इयत्ता ९ ते १२ च्या कार्यक्रमाचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
जून महिन्यापासून शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. दूरदर्शनद्वारे घराघरांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करत होते. त्यासाठी दोन तीन महिन्यांपासून राज्याच्या शिक्षण विभागाकडून दूरदर्शनकडे वेळ मागण्यात आली होती. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना याबाबत पत्र लिहून दूरदर्शनकडून वेळ मिळावी अशी विनंती केली होती. यापूर्वी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’ नावाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरु केला. सोमवार ते शनिवार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सहयाद्री वाहिनीवर सुरु करण्यात आला. मात्र, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असा कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता. मात्र आता नव्याने येत असलेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. केंद्रसरकारने इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा २१ सप्टेंबरपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा सुरु होणार नसल्याचे राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरु होईपर्यंत कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.