प्रा. गंगाधर अहिरे यांनी शब्दबध्द केलेल्या वादळाचे शिलेदार पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक – सामाजिक शक्ती उभी करण्याचे काम महापुरुष करीत असतात, जो महापुरुष वर्तमानकाळात हस्तक्षेप करतो, त्याचा इतिहास होतो. महापुरुषाच्या चळवळीतील त्यांचे अनुयायी इतिहासाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देत असतात. त्या अलक्षीत धुरीणांचा जीवनालेख ‘वादळाचे शिलेदार’ या ग्रंथात प्रा. गंगाधर अहिरे यांनी शब्दबध्द केलेला आहे. इतिहासकार आणि संशोधकांपुढे एक आव्हान या पुस्तकाने निर्माण केले आहे. असे प्रतिपादन डॉ. रावसाहेब कसबे यांनी वादळाचे शिलेदार या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने केले.
येथील रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या सभागृहात परिवर्त परिवारातर्फे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. पुस्तकाचे प्रकाशन औरंगाबाद येथील डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रस्तुत ग्रंथावर सविस्तर विवेचन करून प्रा. गंगाधर अहिरे यांनी अपार बौधिक कष्ट घेऊन हा ग्रंथ साकारलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे निवडक प्रतिक्रांतीवाद्यांना थोपविणा-या क्रांतीवाद्यांची शौर्यगाथा आहे. असे भाष्य करून त्यांनी लेखकाचा गौरव केला.
एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या मा. उपप्राचार्या प्रा. साधना देशमुख यांनी ग्रंथात समाविष्ट असलेल्या महिलांच्या कार्यकर्त्वाचा सांद्यत आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. हा संदर्भग्रंथ असल्याचे त्यांनी नमूद केले. तर देवेंद्र उबाळे म्हणाले की, इतिहास कसा घडतो हे जाणून घेण्यासाठी सामान्य धुरीणांची साधारचरित्रांचा व व्यक्तीचित्रणांचा अभ्यासकांना उपयोग होत असतो. त्या संदर्भाने विविध विचारवंताचे दाखले देऊन, सामान्य कार्यकर्त्याचे इतिहास घडविण्यातील योगदान त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी ग्रंथाचे लेखक प्रा. गंगाधर अहिरे यांनी ग्रंथ निर्मितीमागील आपली भूमिका विशद केली. पुढील काळात अनेक अलक्षीत धुरीणांचा इतिहास संशोधनाच्या बाण्याने शब्दबध्द करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पुस्तकाचे लेखक प्रा.आहिरे व त्यांच्या पत्नी प्रतिभा अहिरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक करूणासागर पगारे यांनी केले. याप्रसंगी ग्रंथ निर्मितीसाठी योगदान दिलेल्या बिपीन बाकळे, चित्रकार संजय उन्हवणे, कवी प्रदीप जाधव, बुध्दभुषण साळवे, अँड. आशोक बनसोडे, आशोक मोरे, सुहास सुरळीकर, श्यामराव बागूल,आदींचा पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारंभाचे सुत्रसंचालन रोहित गांगुर्डे व नितीन भुजबळ यांनी केले. आभारप्रदर्शन डॉ. धीरज झाल्टे यांनी व्यक्त केले. परिवर्त परिवाराचे नीतीन बागूल, किशोर शिंदे, वैशाली रणदिवे, कवी काशिनाथ वेलदोडे, राजेद्र मोकळ, महेंद्र रणदिवे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.