नाशिक – राज्यभर शिवसेनेकडून पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावर बोलतांना आ.प्रा. देवयानी फरांदे म्हणाल्या की आंदोलन करण्यापेक्षा राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवर केलली आकारणी कमी करावी. महाराष्ट्राच्या शेजारी गुजरात राज्यात पेट्रोलचे दर ८३.३३ आहे तर महाराष्ट्रात हेच दर ९३.५१ रुपये लिटर आहे. गुजरात मधील दर दहा रुपयांनी कमी आहे. इतर बाबतीत गुजरातशी स्पर्धा करतात मग पेट्रोलच्या दराच्या बाबत का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील उद्धव सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असताना केवळ केंद्र सरकारवर टीका करून जनतेची दिशाभूल करण्याचा कोविलवाणा प्रयत्न केला जात आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार फरांदे यांनी शिवसेनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर टीका केली. शिवसेनेकडून करण्यात आलेले आंदोलन म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे. हा शिवसेनेचा ढोंगीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात शिवसेना सत्तेत असून पेट्रोल-डिझेल यावर राज्य शासनाकडून मूल्यवर्धीत कर म्हणून मोठ्या प्रमाणावर कर आकारणी केली जाते, त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किमती जास्त आहे. याकडे लक्ष वेधताना, जर शिवसेनेला खरच महाराष्ट्रातील जनतेची चिंता असेल तर जनतेची दिशाभूल न करता पेट्रोल डिझेल वर आकारणी करण्यात आलेले कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा.
काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सरकारने मागील अर्थसंकलात देखील पेट्रोल-डिझेल वर करवाढ केल्याची आठवण करून देतांना काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना ढोंगीपणा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल-डिझेल वरील कर कमी करून जनतेला दिलासा दिला होता. याची आठवण करून देताना, शिवसेनेने देखील राज्य शासनाने पेट्रोल-डिझेल वर आकारणी केलेले कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे.