येवला – जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत वीज बिलांमध्ये इतर कोणतेही आकार जोडून वसूली करू नये, अशी मागणी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महावितरणने चालू महिन्यातील व्यवसायिक बिलांमध्ये समायोजित रक्कम व स्थिर आकार असे दोन्ही एकत्रित लावले आहे. गेले चार महिन्यांपासून व्यवसायिक वीज बिलात स्थिर आकार स्वीकारला नव्हता. परंतु चालू महिन्यात मागील स्थिर आकाराची एकूण थकबाकी ही तीन टप्प्याने म्हणजे ५५१ रुपये व चालू महिन्याचे स्थिर आकार असे जवळपास एक हजार रुपये लागून आल्याने व्यापार्यांची बिलेही वाढवा दिसत आहे. बाजारपेठेतील शुकशुकाट, सम विषम पद्धती व वेळेचे निर्बंध यामध्ये व्यापार थंडावलेला असतांना मोठ्या प्रमाणात आलेली बीले कशी भरायची असा प्रश्न व्यापारी वर्गापुढे आहे, असे सदर निवेदनात म्हटले आहे.
जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत वीज बिलांमध्ये इतर कोणतेही आकार जोडून वसूली करू नये, अशी मागणी करून या प्रश्नी तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. निवेदनावर महासंघाचे अध्यक्ष योगेश सोनवण, भैया थोरात, सुभाष गांगुर्डे, प्रितेश पारख, धीरज चंडालिया, भैया नाशिककर, प्रशांत चंडालिया आदींसह व्यापार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.