नाशिक – रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे चॅट व्हायरल झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक अतिशय गंभीर गोष्टी या चॅटमध्ये आहेत. उद्या यासंदर्भात बैठक घेऊन कारवाईची दिशा ठरवणार आहोत. आम्ही याची चौकशी करतोय. इतक्या संवेदनशील गोष्टी अर्णबला कशा कळल्या याची माहिती घेतोय, असे गृहमं६ी अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी मधील व्यवस्था सर्वात चांगली असून येथून कार्यक्षम पोलीस अधिकारी बाहेर पडतात. या ठिकाणी असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान, अँपिथियेटर, रेन हार्वेस्टिंगचे पर्यावरण पूरक प्रकल्प त्याच प्रमाणे प्रबोधिनीच्या प्रांगणात असलेल्या सर्व सुविधा आणि त्यांची ठेवलेली देखभाल कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
ते आज नाशिक शहरातील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अश्वती दोरजे, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, मालेगांवचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, संग्राम निशाणदार यांचेसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, नाशिक रेंज मध्ये पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पैसे परत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सुरु केलेली यशस्वी मोहीम राज्यस्तरावर राबण्यासाठी प्रयत्न करू. या मोहिमेंतर्गत जवळपास १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना परत देण्यात आले असून हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिक शहर पोलिसांनी सतर्क राहून शहरातील गुन्हेगारीविषयक दर कमी राखला आहे. त्याबाबत गृहमंत्री श्री. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे नाशिक ग्रामीण पोलिसांनी कोरोना काळात मालेगावमध्ये कार्य करत असताना आपले प्राण गमावलेल्या कुटुंबीयांची जबाबदारी घेतली, हा देखील अतिशय संवेदनशील स्तुत्य उपक्रम असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
बैठकीपूर्वी श्री देशमुख यांनी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रांगणातील विविध भागांना भेट देऊन त्याबद्दल माहिती घेतली. यात पोलीस कवायत मैदान, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कँटीन, अँम्पीथियेटर, प्रशिक्षणार्थी यांच्या बॅरेक्स यांचा समावेश होता. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यांना भेट देत श्री. देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
बैठकीप्रसंगी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गृहमंत्री श्री. देशमुख यांना सादरीकरण्याद्वारे माहिती दिली.