नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे इटलीच्या अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सरकारने अनेक शहरातील रेड झोनच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. ज्या भागात कोरोना संसर्गाची आणखी नवीन प्रकरणे समोर येत आहेत, त्यांना रेड झोन म्हणून घोषित केले गेले आहे आणि या भागात कठोर लॉकडाउन नियम लागू करण्यात आले आहेत.
नेपल्स आणि फ्लॉरेन्स प्रांताने रेड झोन घोषित केला आहे, तर शुक्रवारी इटलीच्या अनेक विभागांना कोरोना विषाणूचा ‘रेड झोन’ घोषित करण्यात आला. देशात संसर्गाची मोठ्या प्रमाणात नवीन प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामुळे तेथील रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या अधिक वाढली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक जी रेजा म्हणाले की, रुग्णालयांमध्ये रूग्णांची संख्या वाढत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, म्हणून कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
इटलीमध्ये संक्रमणाच्या नवीन घटनांचे प्रमाण प्रति 1 लाख लोकांमध्ये 650 पर्यंत पोहोचले आहे. गेल्या 24 तासांत 41 हजार नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. इटलीमध्ये गेल्या चोवीस तासांत कोविड -१९ च्या जवळपास १,००० नवीन घटना घडल्या आणि या साथीमुळे कालच 500 लोक मरण पावले. देशात मृतांची संख्या वाढून 44,139 झाली आहे, तर आतापर्यंत 11 लाखाहून अधिक संक्रमणाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. नवीन निर्बंध लक्षात घेता अनेक प्रांत हे लाल, नारिंगी आणि यलो झोनमध्ये विभागले गेले आहेत.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीच्या कॅम्पानिया आणि टस्कनी प्रांतांमध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे त्यांना लाल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच या भागातील लोकांना केवळ कामाच्या ठिकाणी किंवा आरोग्यासाठी घरातून बाहेर जाण्याची परवानगी आहे. सर्व अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद केली गेली आहेत. बार आणि रेस्टॉरंट्सही बंद करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, युरोपमधील बर्याच देशांमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट येत आहे.