वॉशिंग्टन – कोरोना रुग्णांच्या संख्येत ब्राझील शनिवारी जगात दुस-या स्थानावर पोहोचला आहे. लॅटिन अमेरिकेत असलेल्या ब्राझीलमध्ये शुक्रवारी ८५,६६३ नवे रुग्ण आढळले. ब्राझीलमधील एकूण रुग्णांची संख्या १,१३,६३,३८९ झाली आहे. यात २,२१६ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २,७५,१०५ वर पोहोचला आहे. यापूर्वी भारत दुस-या क्रमांकावर होता. देशात एकूण १.१३,०८,८४६ सक्रिय रुग्ण आहेत. २.९३ कोटी रुग्णांसह अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.
इटलीत कोरोनाची दुसरी लाट
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्रागी यांनी कोरोना संसर्गाच्या नव्या लाटेविषयी इशारा दिला आहे. इटलीमधील बहुतांश भागात दुकाने, रेस्टॉरंट आणि शाळा सोमवारी बंद केले जातील. ईस्टरच्या पार्श्वभूमीवर ३-५ एप्रिलला पूर्णपणे लॉकडाउन लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
११.९७ कोटींवर आकडा
जगात कोरोनासंसर्गाचा आकडा ११.९७ कोटींवर गेला असून, आतापर्यंत २६.५३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जगातील सर्वाधिक प्रभावित झालेली अमेरिका वर्षाच्या अखेरपर्यंत गरजेपेक्षा अधिक लस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जॉन्सन अँड जॉन्सनचे १० कोटी डोस खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. लस खरेदीचे निर्देश देण्यापूर्वी अमेरिकेकडे मेच्या मध्यापर्यंत सर्व ज्येष्ठ नागरिकांना लस मिळेल अशी व्यवस्था केली आहे. जुलैअखेर अमेरिकेत ४० कोटी लोकांना लस उपलब्ध असेल. अमेरिकेतील आणखी २० कोटी लोकांना कोविडची लस देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनकडून नव्या लसीचा डोस जूननंतर मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आणखी १० कोटी लोकांना लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे.
चीनचे लसीकरणाचे लक्ष्य
२०२२ च्या मध्यापर्यंत जवळपास ७० ते ८० टक्के लोकांना कोविडची लस देण्याचं लक्ष्य चीन सरकारने ठेवले आहे, असे चीनचे रोग नियंत्रण केंद्राचे (सीडीसी) प्रमुख गाओ फू यांनी सांगितले. ते चीनची सरकारी वाहिनी सीजीटीएनशी ते बोलत होते. चार लसींना मंजुरी मिळाल्यानंतर चीनमध्ये ९० कोटी ते १ अब्ज लोकांचे लसीकरण केले जाईल.