इगतपुरी : स्टेट बँकेच्या अस्वली गोंदे शाखेच्या वतीने पंतप्रधान जीवन ज्योती योजने अंतर्गत मयत खातेदाराच्या वारसाला २ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. केंद्र सरकारच्या ह्या योजनेमुळे गोरगरिबांना फायदा होत असल्याचे शाखाधिकारी राहुल पाटील यांनी म्हटले आहे. बँकेच्या खातेदारांनी ह्या विमा योजनेचा ३३० रुपयांत फायदा घेऊन कुटुंबाला संरक्षित करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
गोंदे दुमाला ता. इगतपुरी येथील सुनीता शंकर बोराडे ह्या महिलेचे बचत खाते येथील स्टेट बँकेच्या शाखेत होते. त्यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत वर्षभरासाठी फक्त ३३० रुपये भरून विमा घेतला होता. काही महिन्यांपूर्वी सुनीता बोराडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा किशोर बोराडे याचे नाव वारसदार म्हणून दाखल होते. स्टेट बँकेच्या अस्वली गोंदे शाखेचे शाखाधिकारी राहुल पाटील यांनी संबंधितांकडून विमा दाव्याची पूर्तता करून घेतली. बँकेचे विमा अधिकारी पंकज जैतमल यांनी मदत करून विमा दाव्याचा निपटारा करण्यासाठी साहाय्य केले. बँक सखी रोहिणी ससाणे, कर्मचारी स्वाती कुलकर्णी, लक्ष्मण पाळदे, बजरंग भागडे आदींनी ह्याकामी परिश्रम घेतले. शाखाधिकारी राहुल पाटील, विमा अधिकारी पंकज जैतमल यांच्या हस्ते लाभार्थी किशोर बोराडे यांना २ लाखांचा लाभ नुकताच देण्यात आला. एका वर्षासाठी फक्त ३३० रुपयांमध्ये आईने घेतलेल्या विमा योजनेमुळे मिळालेल्या २ लाखांचा मोठा आधार मिळाल्याचे किशोर बोराडे यांनी सांगितले.
दोन लाखांचे संरक्षण
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना १८ ते ५० वयोगटातील बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी उपलब्ध आहे. ३३० रुपये वार्षिक भरून २ लाखांचे चांगले संरक्षण खातेदाराला मिळते. या योजनेत सर्वांनी सहभागी व्हावे. सहभागासाठी आपल्या माहितीतील लोकांना समजावून सांगावे.
– राहुल पाटील, शाखाधिकारी स्टेट बँक