इगतपुरी – ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी तसेच मुंबई-नाशिक प्रवास कमी वेळेत व्हावा, यासाठीच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या लेकबिल फाटा ( व्हिटीसी फाटा) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रीमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता सोळा किलोमीटरचा असून याकामी सुमारे २५० कोटी रुपये खर्च येणार आहे. या रस्त्यामुळे घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयाची कनेक्टीव्हिटी तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल अवघ्या काही मिनिटात नाशिकमध्ये पोहचविणे सोपे होणार असून विकासाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. खासदार गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्यामुळे नाशिककरांसह इगतपुरी तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक येथून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून रस्त्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची होत असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होत असते. प्रवाशाच्या वेळेत बचत व्हावी, याबरोबरच इगतपुरी तालुक्यातील गावागावांमधील दळणवळण वाढण्यासाठी दारणा फाटा ते कवडदरा फाटा या दरम्यान रस्ता असावा, यासाठी खा. गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. खा. गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दारणा फाटा ते कवडदरा फाटा या दरम्यानच्या प्रस्तावित सोळा किलोमीटरच्या रस्त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रीमंडळाच्या पायाभूत समितीने प्रस्तावित रस्त्याच्या कामाला मान्यता दिली आहे.
घोटी-सिन्नर महामार्गावर कवडदरा फाटा असून नाशिक-मुबंई महामार्गावर दारणा फाटा आहे. कवडदरा फाटा ते दारणा फाटा हे अंतर सोळा किलोमीटरचे आहे. या रस्त्यावर बेळगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, दारणा डॅम, साकूर फाटा, कवडदर गाव आदी गावे आहेत. या प्रस्तावित रस्त्याला पायाभूत समितीने मान्यता दिल्याने आता लवकरच कामास प्रारंभ होणार आहे. सदर काम अडीचशे कोटी रुपयांचे असून बांधकामावर प्रत्यक्ष खर्च १६२.७ कोटी रुपये होणार असून उर्वरित खर्च भूसंपादनासाठी होणार आहे. या रस्त्यावर चार मोठे पुल तर तीन लहान पुल असणार आहेत. ३७ पाईप मोऱ्या असून दोन मोठे आणि पंधरा लहान चौक असणार आहेत.या रस्त्यासाठी ४०.७३ हेक्टर जमीनीची गरज असून पैकी २३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध असून १७.६० हेक्टर जमीन अधिग्रहीत करावी, लागणार आहे. या रस्त्यामुळे घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग हे तीन महामार्ग एकमेकांना जोडली जाणार आहेत.यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना घोटी परिसरातील एस.एम.बी.टी.या रुग्णालयात जाणे-येणे सोपे होणार आहे.तसेच इगतपुरी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल अवघ्या काही मिनिटात नाशिक शहरात पोहचविणे सोपे होणार असून विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे.